Breaking News

मनसेचा राज्य सरकारला अल्टिमेटम

सोमवारपर्यंत वीज बिले माफ न झाल्यास तीव्र आंदोलन

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोना काळात आलेली वाढीव वीज बिले सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकताच पत्रकार परिषदेत दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. जर वीज मंडळाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले, तर मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. वाढीव वीज बिले भरू नयेत, असे आवाहनही नांदगावकर यांनी केले आहे.
शरद पवारांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत नाही
वाढीव वीज बिले माफ करण्याबाबत राज ठाकरे स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले होते. त्या वेळी त्यांना निवेदने देण्यास सांगण्यात आले. त्यावर विविध कंपन्यांची निवेदनेही पवारांकडे पाठवण्यात आली, मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. आम्हाला शरद पवारांवर विश्वास आहे, पण आता त्यांनाही सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही असे आम्हाला वाटते, असेही बाळा नांदगावकर यांनी नमूद केले.
जनतेचा उद्रेक झाल्यास जबाबदारी सरकारची
राज्य शासनाने श्रेयवादाची लढाई न करता लोकांची वीज बिले माफ करावीत. सोमवारपर्यंत यावर निर्णय झाला नाही, तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेकडून मोर्चे काढण्यात येतील, तसेच राज्यभर मनसे स्टाइल उग्र आंदोलने केली जातील. या वेळी जर उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही या वेळी नांदगावकर यांनी दिला.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply