Breaking News

या चारमधील कोणता आर्थिक वर्ग आपला आहे?

अर्थप्रहर

पैशांची कमाई आणि त्याचा विनियोग करण्याच्या पद्धतीतून समाजात हे चार वर्ग निर्माण झाले आहेत. आपण त्यातील कोणत्या वर्गात आहोत, हे आपण शोधायचे असून आज चुकीच्या वर्गात असू, तर त्यात दुरुस्ती करण्याची हीच खरी वेळ आहे!

ज्यांना जगण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते, त्यांना त्या कामाच्या किंवा नोकरीच्या पलीकडे काही सुचू शकत नाही.त्यातील अनेकांना इतके काम करावे लागत असते की इतर काही करण्याचे शारीरिक, मानसिक बळ त्यांच्याकडे उरत नाही. असे असूनही त्यांच्या हातात पगार म्हणून जो पैसा पडतो, तो अगदीच तुटपुंजा असतो. त्यामुळे संसार हाकताना त्यांची सतत धावपळ सुरु असते. महिन्याच्या नियमित कमाईत कमी जास्त झाले, तर त्यांना एक तर उधार उसनवारी करावी लागते किंवा काही खर्चांना कात्री लावावी लागते. त्याचे कुटुंबात सतत ताण तयार होत राहतात. आपल्या आजूबाजूला बहुतांश निम्न मध्यमवर्गात साधारण हेच चित्र पाहायला मिळते.

पण मग असाही एक वर्ग असतो, जो मध्यम म्हणता येईल, अशीच कमाई करत असतो, पण त्यांचे जीवनमान आधीच्या वर्गापेक्षा कितीतरी चांगले असते. अशा घरातील माणसे नित्यनियमनाने सहलीला जाताना दिसतात. त्यांना काही छंद असतात. नियमित कमाईत जे होणार नाही, असे वाटते, त्या सर्व गोष्टी ते करत असतात!

तिसरा असाही एक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो, जो किती पैसे कमावतो, याचा अजिबात अंदाज येत नाही. पण त्यांना कधीही पैसा कमी पडत नाही, असेच त्यांचे जीवनमान सांगत असते. आश्चर्य म्हणजे ते कमावत कधी असतात, हेही लक्षात येत नाही. कारण त्यांचे जीवन ऐषोआरामात चालले आहे, असेच दिसत असते.

आणि चौथा असाही एक वर्ग असतो, ज्यांच्या घरी अक्षरशः पैसा वाहत असतो. गाड्याघोड्या यांची काहीच कमी नसते. त्यांच्या सांपत्तिक स्थितीची असूया वाटावी, असेच त्यांचे जीवनमान असते. पण मग कधीतरी अशा कुटुंबाविषयी काही बातम्या कानावर येवू लागतात, ज्यात काहीतरी आर्थिक गडबड झालेली असते किंवा कुटुंबात मोठा कलह सुरू झालेला असतो. त्या कुटुंबाने काही संकटांना स्वत:च आमंत्रण दिलेले आहे, असे लक्षात येते.

* गुंतवणुकीच्या मार्गाकडे वळलेले

दुसर्‍या वर्गातील जी माणसे असतात, त्यांचे उत्पन्न पहिल्या वर्गातील माणसांपेक्षा खूप अधिक नसते. पण जीवनाच्या सुरुवातीच्याच टप्प्यात बचतीचे महत्त्व त्यांना पटलेले असते आणि ते आता गुंतवणुकीच्या मार्गाकडे वळलेले असतात. आपल्या आजूबाजूची श्रीमंत माणसे पैसा कसा वाढवितात, याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे एखाद्या श्रीमंताची ओळख काढून त्याकडून सल्ला घेऊन ते बचतीच्या पुढे गुंतवणुकीच्या मार्गावर चालायला लागलेले असतात. त्यातील काही जण नोकरीत असताना पीएफचा वाटा वाढविण्याची संधी आली की ती घेवून टाकतात. पीएफला शक्यतो शेवटपर्यंत हात लावत नाहीत. बँकेतही फ्लेक्सी खाते काढतात, म्हणजे अधिक पैसे खात्यात पडून असतील तर त्याचे रुपांतर छोट्या काळासाठीच्या एफडी मध्ये आपोआप होते आणि बचत खात्यापेक्षा अधिक व्याज मिळू लागते. शेअर बाजार, म्युच्युअल फंडांविषयीची माहिती घेवून दर महिन्याला त्यांनी एसआयपी सुरू केलेली असते. त्यामुळे काही आर्थिक अडचण आलीच तर त्याच्याकडे काहीतरी पुंजी कायम असते. आरोग्य विम्याचे महत्त्वही त्यांना कळलेले असते. त्यामुळे आजारपणाच्या खर्चामुळे त्यांच्यावर उसणवारी करण्याची वेळ येत नाही. थेंबे थेंबे तळे साचे, या न्यायाने त्याच्याकडे पैसा साचत असतो आणि तो वाढतही असतो. त्यामुळेच कमी वेतन असूनही अशा माणसांचे जीवनमान चांगले असल्याचे दिसते.

बचत, गुंतवणूक-ही फार लांबची गोष्ट


अशा या चार वर्गातील माणसे म्हणजे कोण, हे आता पाहू. पहिला वर्ग आहे तो मुळातच कमी कमाई असलेला. त्याला पैशाचे व्यवस्थापन करण्याची काही संधीच नसते. कधीतरी जेव्हा अधिक पैसा मिळतो, तेव्हा मनात दबून राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मन उचल खाते आणि तो पैसा खाण्यापिण्यात किंवा एखादी इच्छा पूर्ण करून घेण्यातच जिरायला वेळ लागत नाही. बचत, गुंतवणूक – हे त्यांच्यासाठी फार लांबची गोष्ट असते. त्यामुळे नाही म्हणायला, त्याने त्याची इच्छा पूर्ण करून घेतलेली असते. त्यातही थोडा विचारी माणूस असेल तर त्याने अशावेळी बँकेत एफडी केलेली असते. किंवा रिकरिंग खाते सुरू केलेले असते. एखाद्या पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतविलेले असतात. अर्थात, त्यातून कमी पैसा तयार होत असला तरी त्याला अडचणीच्या वेळी त्याचाच आधार असतो. हा वर्ग म्हणजे बचतीचे ज्ञान न झालेला किंवा नुकतेच ते झाल्याने बचतीच्या मार्गाला लागलेला वर्ग होय.

* पैशाला पैसा जोडल्याशिवाय वाढत नाही

आता तिसरा वर्ग पाहू. हा वर्ग एकतर मुळात श्रीमंत असतो आणि त्याला गुंतवणुकीचे महत्त्व केव्हाच पटलेले असते. त्यामुळे पैशाला पैसा जोडला की तो वाढतो, याचे बाळकडू त्यांना कुटुंबातूनच मिळालेले असतात. आपल्याकडे खूप पैसा आहे, असे हा वर्ग कधीच दाखवीत नाही. पण त्याला काही कमी पडते आहे, असे कधीच जाणवत नाही. ते सहलीला जात असतात, त्यांच्याकडे गाडी असते. ते सांस्कृतिक घडामोडींमध्ये भाग घेत असतात. सर्वच अर्थाने त्यांचे जीवनमान चांगले म्हणता येईल, असे असते. पैशाला पैसा जोडल्याशिवाय तो वाढत नाही, असेही त्यांना माहित असते. त्यामुळे उत्पन्न वाढताच, ते बचतीच्या मार्गावरून गुंतवणुकीच्या मार्गावर उडी मारतात. ते आर्थिक क्षेत्राची माहिती असलेला एखादा मित्र किंवा थेट सल्लागार जवळ करतात. भविष्यातील चिंता दूर होण्यासाठी कोणता विमा काढला पाहिजे, म्युच्युअल फंड आणि थेट शेअर बाजारात किती प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे, सोन्यात किती पैसे गुंतविले पाहिजेत, अशा माहितीचे वाचन करून त्यांनी आपल्याकडील अतिरिक्त पैशाला कामाला लावलेले असते. त्यामुळेच अनेकदा काम करत नसताना त्यांच्याकडे पैसा येताना दिसतो. कारण या प्रकारच्या गुंतवणूक साधनांत पैसा गुंतविला आणि चांगला कालखंड सापडला तर त्यात भरभक्कम वाढ झालेली असते. शिवाय आरोग्य विमा आणि टर्म विम्याचे महत्त्व त्यांना कळलेले असते. आरोग्य विम्यासाठी दरवर्षी विशिष्ट रक्कम भरली आणि आपण आजारी पडलो नाही तर ती रक्कम वाया गेलेली नाही, याची जाणीव त्यांना झालेली असते. तसेच पारंपरिक विमा गुंतवणूक म्हणून किंवा कर वाचविण्यासाठी घ्यायचा नसतो, एवढे ज्ञान त्यांना झालेले असते. थोडक्यात, भविष्याविषयीच्या आर्थिक चिंतेतून त्यांनी सुटका करून घेतलेली असते आणि त्यामुळेच त्यांचे वर्तमानातील जीवनमान अधिक समृद्ध आहे, असे दिसत असते.

* पैसा एटीएममधून बाहेर येतो!

आणि आता चौथा वर्ग. त्याच्याकडे पैसा तर खूप असतो, पण जेवढा असतो, त्याच्यापेक्षा अधिक तो दाखविण्याची त्याची इच्छा अतिशय प्रबळ असते. त्यामुळे आपल्या दारात उंची गाडी उभी राहिली पाहिजे, घरात सतत नव्या वस्तू येत राहिल्या पाहिजेत, असे त्याला वाटत राहते. मुलांना काही कमी पडू नये, या नावाखाली मुलांचे भरपूर लाड केले जात असतात. पैसा कमावला जात नाही, तो एटीएममधून बाहेर येतो, एवढेच त्या घरातील मुलांना माहित असते. अर्थातच, कोणताही खर्च करणे, हा मुले आपला अधिकार मानू लागतात आणि मुलांवर भरपूर खर्च करणे, हे अशा पालकांना प्रतिष्ठेचे वाटते. पैसा आहे तोवर खर्च करण्यास मागेपुढे पाहू नका आणि भविष्याचाही फार विचार करू नका, अशा संस्कारांमुळे अशा कुटुंबात पैशाला गळती तर लागतेच, पण तो कमावण्यासाठीचे अनेकदा अवैध मार्गही चोखळण्यास मागेपुढे पाहिले जात नाही. त्यातून हा वर्ग कल्पनाही करता येणार नाही, अशा संकटांना स्वतःच जन्म देत असतो.

तर असे हे आपल्या आजूबाजूला दिसणारे चार वर्ग. पैशांना आधुनिक काळात किती महत्त्व आले आहे, हे वेगळे सांगण्याची आता गरज राहिलेली नाही. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात आजच्या वर्तमानात त्याचा अनुभव आपण घेतच आहोत. ज्यांनी पैशांना सांभाळले, तो पैसा अशा काळात त्यांना सांभाळतो आहे तर ज्यांनी पैशाला सांभाळले नाही त्यांच्यापासून तो दूर गेला आहे. सारखेच उत्पन्न मिळविणार्‍या दोन कुटुंबाची आर्थिक स्थिती सारखी नाही, असे अनेकदा आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्यांची आर्थिक स्थिती आज चांगली नाही, त्यांनी कोणत्या चुका केल्या आणि ज्यांची आर्थिक स्थिती आज चांगली आहे, त्यांनी नेमकी कोणकोणत्या दक्षता घेतल्या, हे या चार वर्गाच्या वर्णनावरून आपल्याला सहजच लक्षात येईल. आज कोरोनाचे जगव्यापी संकट आले, उद्याही अशी संकटे येवू शकतात. त्यांचा मुकाबला करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी रास्त अपेक्षा केली जाते, पण आपली एकूण लोकसंख्या पाहता, अशी सरकारी मदत घराघरापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे ज्यांना पैशांचे महत्त्व लक्षात आले आहे, त्यांनी गुंतवणुकीच्या मार्गाने सांभाळणे आणि भविष्यातील ताण कमी करून घेणे, एवढेच आपल्या हातात आहे. चांगले काम करण्यासाठी कधीच उशीर होत नाही, असे म्हणतात. गुंतवणूक करण्यासाठीही कधीच उशीर होत नाही. त्यामुळे अशी सुरुवात आपल्या आपल्या आर्थिक क्षमतेनुसार प्रत्येकाने केली पाहिजे. अर्थात, आपण दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्गात असले पाहिजे, हे ओघाने आलेच.

बचत, गुंतवणूक-ही फार लांबची गोष्ट

अशा या चार वर्गातील माणसे म्हणजे कोण, हे आता पाहू. पहिला वर्ग आहे तो मुळातच कमी कमाई असलेला. त्याला पैशाचे व्यवस्थापन करण्याची काही संधीच नसते. कधीतरी जेव्हा अधिक पैसा मिळतो, तेव्हा मनात दबून राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मन उचल खाते आणि तो पैसा खाण्यापिण्यात किंवा एखादी इच्छा पूर्ण करून घेण्यातच जिरायला वेळ लागत नाही. बचत, गुंतवणूक – हे त्यांच्यासाठी फार लांबची गोष्ट असते. त्यामुळे नाही म्हणायला, त्याने त्याची इच्छा पूर्ण करून घेतलेली असते. त्यातही थोडा विचारी माणूस असेल तर त्याने अशावेळी बँकेत एफडी केलेली असते. किंवा रिकरिंग खाते सुरू केलेले असते. एखाद्या पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतविलेले असतात. अर्थात, त्यातून कमी पैसा तयार होत असला तरी त्याला अडचणीच्या वेळी त्याचाच आधार असतो. हा वर्ग म्हणजे बचतीचे ज्ञान न झालेला किंवा नुकतेच ते झाल्याने बचतीच्या मार्गाला लागलेला वर्ग होय.

-यमाजी मालकर

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply