थोडी जोखीम घेवून भांडवल वृद्धी करावयची की भांडवलाची सुरक्षितता पहावयाची, या प्रश्नाचे सोपे उत्तर, सुरक्षिततेला महत्त्व आहे, असे असले तरी सध्याच्या चलनवाढीच्या काळात वृद्धीचाही विचार केला पाहिजे. त्यामुळेच गुंतवणुकीला अधिक महत्त्व आले आहे.
मागील 22 वर्षांत, व्यवसायाच्या निमित्तानं अनेक लोकांशी व्यवसायिक संबंध प्रस्थापले गेले. अनेक लोकांचं संपत्ती व्यवस्थापन करताना काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या त्याच आज लेखाच्या स्वरूपात मांडत आहे. (कमावलेली) संपत्ती म्हणजे वेल्थ असं गृहीत धरल्यास त्यात त्या मालकाच्या बाजूनं अनेक पैलू येतात. ज्या गोष्टींना सर्वसामान्य लोक ’खर्च’ असं संबोधतात अशा अनेक गोष्टींना काही लोक ’गुंतवणूक’ संबोधत असतात, त्यामुळं प्रत्येक व्यक्तीगणिक या गोष्टींची व्याख्या बदलल्यानं त्यासंबंधित गोष्टींची रूपरेषा सुद्धा बदलली जाते आणि त्यामुळं खर्च व गुंतवणुकीची गणितं देखील खूप बदलतात.
एका संपत्तीवान गृहस्थांशी बोलताना लक्षात आलं की त्यांच्या घरात असलेली विविध महागडी तैलचित्रं / पेंटिंग्स हा देखील त्यांच्या संपत्तीचा हिस्सा आहे. काहींना जुन्या गाड्या जपण्यामध्ये स्वारस्य असतं आणि जरी अशा गाड्यांमध्ये केली गेलेली गुंतवणूक कोणताच परतावा देत नसेल तरी अशी गुंतवणूक (खर्च) हा जणू त्यांच्या जीवनशैलीचाच एक भाग बनून जातो. एक महाशय असे आहेत, जे स्वतः कधीच मद्य घेत नाहीत परंतु महागडे असे विविध मद्यप्रकार निरनिराळ्या आकाराच्या बाटल्यांमधून संग्रहित करणं हा त्यांचा छंद वजा शैली बनून गेलाय आणि त्यासाठी खर्च करणं त्यांना काही वावगं वाटत नाही आणि अशांच्या दृष्टीनं ती एक गुंतवणूकच असते. शेवटी,‘शौक बडी चीज हैं’ हे देखील खरंय.
हे लोक आपल्या मिळकतीचा अथवा संपत्तीचा एक हिस्सा अशा गोष्टींमध्ये गुंतवतात, ज्यांमधून आर्थिकदृष्ट्या काहीही फायदा नसतो..तरी संपत्ती व्यवस्थापन करताना या गोष्टी ग्राह्य धराव्या लागतात कारण इथं जरी केलेल्या गुंतवणुकीची भांडवल वृद्धी गृहीत धरता येत नसली तरी त्या मनुष्याचं समाजातील स्थान, त्याची इभ्रत, यांचं मूल्यकरता येणे अवघड आहे. यावरून एक गोष्ट बोलली जाते, एका माणसानं स्विस बनावटीचं अत्यंत महागडं लाखो रुपये किंमतीचं असं घड्याळ घातलेलं असतं आणि त्याला खिजवण्याच्या उद्देशानं एक जण त्याला विचारतो की, तुमचं घड्याळ लाखो रुपयांचं तर माझं घड्याळ केवळ काही शे रुपयांचं आहे, तरीही दोन्ही घड्याळं वेळ मात्र एकच दाखवतात! यावर तो पहिला मनुष्य उत्तरतो, दोघांच्या किंवा सगळ्यांच्या घड्याळातील दिसणारी वेळ जरी सारखीच असली तरी माझं घड्याळ माझी वेळ कशी (चांगली) आहे हे दर्शवतं.. हा झाला संपत्ती व्यवस्थानातील एक पैलू.
दुसरा पैलू किंवा संपत्ती व्यवस्थानाचा हेतू म्हणजे, संपत्ती व्यवस्थापनात असलेली संपत्ती वृद्धिंगत होण्यावर जास्त भर न देता तिचा र्हास न होऊ देता (इरोझन) ती टिकवून ठेवण्यास जास्त महत्व येतं. यामध्ये भांडवलवृद्धी (कॅपिटल ऍप्रिसिएशन) आणि भांडवल संस्करण (कॅपिटल प्रिझर्व्हेशन) ह्या दोन मूलभूत गोष्टी येतात.
* भांडवल वृद्धी : खरेदी केलेल्या मालमत्तेच्या बाजारभावातील फरकानं मिळवलेला नफा म्हणजेच भांडवल वृद्धी. शेअर्स, म्युच्युअल फंड्स, सोनं-चांदी, स्थावर मालमत्ता इ. गोष्टींची खरेदी किंमत आणि कालांतरानं त्यांच्या वाढलेल्या बाजारभावामुळं वाढलेलं मूल्य, म्हणजे त्या त्या प्रकारातील भांडवल वृद्धी. मालमत्तेचं मूल्य हे अनेक कारणांनी वाढू शकतं. भांडवली आर्थिक वाढ किंवा रिझर्व्ह बँक पॉलिसी, मॅक्रोइकॉनॉमिक्स घटक किंवा कर्जाच्या वाढीस उत्तेजन देणारी, अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा ओघ आणणारी धोरणं, यांसह मालमत्ता मूल्यांमध्ये वाढ होण्याचा सामान्य कल असू शकतो. तथापि, भांडवल वृद्धी केवळ गुंतवणूकीमधून उत्पन्नाचा स्रोत ठरू शकत नाही तर त्याखेरीज विविध गुंतवणूक पर्यायांमधून मिळणारं व्याजाचं उत्पन्न, शेअर्स अथवा म्युच्युअल फंड्सवर मिळणारे लाभांश आणि स्थावर मालमत्तेवर मिळणारं भाडं हे देखील गुंतवणूकदारांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. भांडवलवृद्धीच्या दृष्टीनं लक्ष्य केलेल्या गुंतवणूकीत (ग्रोथ स्टॉक्स, इक्विटी म्युच्युअल फंड्स, सोनं, स्थावर मालमत्ता, इ.) भांडवल संस्करणासाठी किंवा उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवडलेल्या ऍसेटपेक्षा (व्हॅल्यू स्टॉक्स, सरकारी बाँड, म्युनिसिपल बॉन्ड्स किंवा लाभांश देणार्या कंपन्यांचे शेअर्स, फिक्स्ड डिपॉझिट्स, इ.) अधिक जोखीम असते.
* भांडवल संस्करण : याउलट, भांडवल संस्करण ही एक पुराणमतवादी गुंतवणूकीची रणनीती आहे जिथं भांडवल म्हणजेच मूळ गुंतवणुकीचा र्हास होऊ न देणं व पोर्टफोलिओमधील तोटा टाळणं हेच प्राथमिक लक्ष्य असू शकतं. भांडवल संस्करणासाठी वापरल्या जाणार्या पर्यायात जोखीम कमी असते. सेवानिवृत्त लोकांसाठी भांडवल संस्करण ही अत्यंत महत्त्वाची बाब असू शकते कारण त्यांचा घरखर्च भागविण्यासाठीच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणजे त्यांच्या जवळ असलेली / जमवलेली रक्कम. परंतु गुंतवणूक अत्यंत सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांत एक धोका राहू शकतो तो म्हणजे दीर्घ कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूकीमधून मिळणारा परताव्याचा दर व वाढत्या महागाईचा दर आणि त्यामुळं गुंतवणुकीद्वारे मिळणारं नियमीत स्थिर उत्पन्न व महागाईच्या दरानुसार वाढत जाणारा घरखर्च. अल्प कालावधीत चलनवाढीचा परताव्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार नसला तरी कालांतराने ते गुंतवणूकीचं वास्तविक मूल्य कमी करू शकतं आणि हाच धोका ओळखून सुरक्षित व अन्य योग्य अशा पर्यायात गुंतवणूक करून, एकूणच गुंतवणूक संस्करण व प्रमाणात भांडवल वृद्धी यांचा योग्य समन्वय साधून गुंतवणूकदाराच्या जीवनाच्या शेवटापर्यंत ती गुंतवणूक आपल्या नियमित उत्पन्नाचा स्रोत ठरेल हेच उद्दिष्ट ठेवणं उचित.
सुपर शेअर : ओएनजीसी
जागतिक बाजारात मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत जवळपास चार टक्क्यांनी वाढ झाली आणि मार्चपासून न पाहिलेले उच्चांक गाठले गेले. तिसर्या आश्वासक कोरोना व्हायरस लसीने इंधन-मागणी पुनर्प्राप्तीची आशा निर्माण केली. ऑक्सफोर्ड-ऑस्ट्राझेनेका लसीच्या चाचणी परिणामांमुळं उत्पन्न झालेल्या आशेमुळं कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या. त्याअगोदरच ओपेक राष्ट्रांच्या बैठकीच्या अगोदरच्या अटकळीतही कच्च्या तेलाच्या किंमती कायम राहिल्या कारण जानेवारी 2021 मध्ये हा समूह आणखी उत्पादन कटौतीसाठी विचार करू शकेल या आशेनं सर्व ऊर्जा पुरवठादार व तेल आणि वायू संबंधीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, देशातील अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने उघडत असल्याने रिफायनरी कंपन्यांना येत्या काही महिन्यांत त्यांची क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. याच जोरावर मागील अनेक दिवस तेजीमध्ये सहभागी न झालेल्या नवरत्न अशा ओएनजीसी कंपनीचा शेअर साडेनऊ टक्क्यांची वाढ नोंदवून या आठवड्यात सुपर शेअर ठरला. मागील महिन्यात नोंदवलेल्या नीचांकापासून 28 टक्के वाढ दर्शवून आता हा शेअर आपलं 84 रुपयांचं उद्दिष्ट गाठायच्या तयारीत आहे.
-प्रसाद भावे