Breaking News

वणवे रोखण्याची जबाबदारी महत्वाची -अभिनेत्री शुभांगी गोखले

कर्जत : बातमीदार

वणवे लागून जंगलातील वनसंपदा नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी सामाजिक भान राखत सगुणा वनसंवर्धन समिती वणवे रोखण्याची जबाबदारी काही प्रमाणात पार पाडत आहे.  अशी जबाबदारी समाजातील सर्वांनी उचलायला हवी, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी येथे व्यक्त केले.  सगुणा रुरल फाऊंडेशन व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वणवा विझवण्यासाठी व वनसंवर्धनासाठी धावून आलेल्या व्यक्तींचा सत्कार नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील आंबेवाडी येथील सामाजिक सभागृहात करण्यात आला. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले बोलत होत्या.नेरळमधील वनखात्याच्या सर्व्हे नंबर 310 या टेकडीवर 13 फेब्रुवारी रोजी लागलेला वणवा सदा दरवडा, आलो पारधी, नामा पारधी, गोटीराम पारधी, देहू दरवडा, संतोष दरवडा, नागो दरवडा, पांडुरंग दरवडा, नारायण पारधी या तरुणांनी जीवाची पर्वा न करता विझवला व जंगल वाचवले. सगुणा वनसंवर्धन तंत्र यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग फार महत्त्वाचा असतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला या सगुणा तंत्राचे शोधक शेखर भडसावळे यांनी देशाची समस्या बनलेल्या वणव्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संपूर्ण समाजाने पुढे येण्याची गरज बोलून दाखवली. वनक्षेत्रपाल नारायण राठोड, नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, वनपाल दत्तात्रय निरगुडा, जीवशास्त्र अभ्यासक अनुराधा भडसावळे आदी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

वन विभागाच्या मदतीने सगुणा तंत्र जंगले वाचविण्यासाठी वापरले जात आहे. ते वन विभाग राज्यात वापरणार आहे. त्यामुळे भविष्यात जंगले वणव्यापासून दूर राहतील.

-शेखर भडसावळे, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त शेतकरी, नेरळ, ता. कर्जत

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply