अधोरेखित
वर्षाच्या सुरुवातीपासून अवघ्या जगाला आपल्या कवेत घेऊन अक्षरश: होत्याचे नव्हते केल्यानंतर महाभयंकर कोरोना महामारीवर वर्ष संपता संपता लस उपलब्ध होत आहे. कोविड-19 विषाणूचा जनक व लपवाछपवीत माहीर असलेल्या चीनकडे त्यावरील ठोस लस आहे की नाही हे त्यांनाच ठावूक, पण विविध लशींची होत असलेली निर्मिती पाहता या संकटाचा त्रास भोगावा लागलेल्या अन्य देशांमध्ये प्रचंड उलथापालथीनंतर आशेचे किरण दिसू लागले आहेत. आपला भारतही यात समाविष्ट आहे, परंतु प्रचंड लोकसंख्या असूनही भारताने तत्पूर्वीच कोरोनावर मिळविलेले नियंत्रण उल्लेखनीय म्हटले पाहिजे.
यंदाचे वर्ष संपायला आता काही दिवस बाकी आहेत. हे वर्ष कोरोना या एकाच गोष्टीभोवती फिरत राहिले. देशात मार्चच्या अखेरीस कोविड विषाणूने केलेला शिरकाव व सोबतच लागू झालेली टाळेबंदी (लॉकडाऊन), पुढे एप्रिल-मे महिन्यांतील कडक संचारबंदी, मग जूनपासून शिथिल होत गेलेले निर्बंध (अनलॉक) आणि आता कोरोनावरील लशींची होत असलेली चाचणी या नऊ महिन्यांच्या काळात नागरिकांचे जीवनमान पार बदलून गेले.
वैश्विक संकट कोरोनाची जवळपास सर्वच देशांना झळ बसली. जागतिक महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका कोरोनापुढे पूर्णत: हतबल ठरली. (अजूनही तेथील नागरिक या संकटाचा सामना करीत आहेत.) त्याखालोखाल इंग्लंड, ब्राझील, इटलीसह इतर युरोपिय देशांमध्ये या महामारीने थैमान घालून असंख्य नागरिकांचे बळी घेतले. आशिया खंडात मोडणार्या आपल्या भारतातही अनेकांना कोरोनाची लागण झाली, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला, परंतु अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडील
जीवितहानी कमी आहे. मुख्य म्हणजे 135 कोटींहून अधिक लोकसंख्या असणार्या भारताने मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होऊनही त्याला थोपविण्यात मिळविलेले यश दिलासादायक आणि जगाला आदर्शवत आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
सद्यस्थितीत देशातील कोरोनामुक्त होणार्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून मृत्यूदरही घटत आहे. याचे श्रेय जाते ते सक्षम व दूरदृष्टीच्या नेतृत्वाला अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींना. त्यांनी वेळीच लॉकडाऊन घोषित करून तसेच अन्य कडक निर्णय घेऊन व उपाययोजना राबवून देशाला उद्ध्वस्त होऊ दिले नाही. त्याच वेळी देशवासीयांचा आत्मविश्वास खच्ची होऊ नये यासाठी त्यांना वेळोवेळी हिंमत दिली. शिवाय 20 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करून प्रत्येक क्षेत्राला व घटकाला आधार देण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे झालेले नुकसान लगेच भरून निघणारे नाही, तर कटू आठवणी हृदयातून कधीच पुसल्या जाणार्या नाहीत, पण यातून सावरत देश येत्या काळात नव्या जोमाने उभारी घेईल याची चाहूल एव्हाना लागली आहे.
कोरोना महामारीची तीव्रता अधिक होती तेव्हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वारंटाइन, आयसोलेशन यांसारखे शब्द सातत्याने कानावर पडत होते. आता वेगवेगळ्या लशींची सर्वत्र चर्चा आहे. एकवेळ अशी होती की एखाद्याला कोरोना झालाय असे कळले तरी परिचयातील लोकांचा थरकाप उडत असे. कोविड विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीने जणू कोणता तरी गुन्हा केलाय अशी वागणूक त्याला मिळायची. काही ठिकाणी तर कोरोनाबाधितांची जवळच्यांनीच साथ सोडल्याचे दिसून आले. दुसरीकडे सर्वच रुग्णालये तेव्हा कोरोना रुग्णांनी भरली असल्याने अनेकांना बेड उपलब्ध होत नव्हते. अशा प्रकारे कोरोनाची दहशत व कोलमडलेल्या यंत्रणेमुळे अनेक जणांचा जीव गेल्याचे दिसून आले. या विपरीत परिस्थितीतही काही संवेदनशील हात मदतीसाठी सरसावले. त्यात पनवेलच्या ठाकूर कुटुंबीयांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तन-मन-धनाने मदत करून जनतेला दिलासा दिला. त्याचप्रमाणे शासकीय-प्रशासकीय पातळीवर आवाज उठवून नागरिकांच्या अडचणी कमी करण्यात हातभार लावला.
कोरोनारूपी त्सुनामीने बरीच वाताहत झाल्यानंतर सरतेशेवटी जगभरात वेगवेगळ्या लशी येऊ घातल्या आहेत. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला मंजुरी दिली असून, आज-मंगळवारपासून तेथील नागरिकांना ती लस दिली जाणार आहे. अमेरिकेतील फायझर आणि जर्मनीतील बायोएनटेक या कंपन्यांनी ही लस तयार केली असून, ती 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. फायझरने गेल्या आठवड्यात ब्रिटन आणि बहरिनच्या सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मिळवल्यानंतर या कंपनीने भारतातही परवानगीची मागणी करणारा अर्ज डीजीसीआय अर्थात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे केला आहे. पाठोपाठ पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लशीच्या वापराची परवानगी मागितली आहे. या लशीसाठी ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार असल्याचे ‘सीरम’चे अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. अमेरिकेत मॉडर्ना आणि फायझर लस दिली जाणार आहे. रशियातही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. रशियाने स्पुटनिक व्ही लस तयार केली असून, अनेकांवर त्याची चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाचे उगमस्थान चीननेही यापूर्वीच लशीचा दावा केला आहे. त्यांच्याकडील एकदम घटलेली रुग्णसंख्या त्यास पाठबळ देते, पण मग चीनने ही लस इतर देशांना वेळीच का उपलब्ध करून दिली नाही, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. ‘ड्रॅगन’वर कुणाचाही भरवसा उरलेला नाही.
भारतात सध्या लशींची अहमकमिका सुरू आहे. ‘सीरम’खेरीज अहमदाबादचे झायडस बायोटेक पार्क, हैदराबादची भारत बायोटेक संस्था, पुण्याची जेनोवा बायो फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हैदराबादची बायलॉजिकल ई लिमिटेड आणि डॉ. रेड्डीज यांची लॅबोरेट्रीज लिमिटेड आदी कंपन्यांकडून लशीचे संशोधन व चाचण्या सुरू आहेत. यापैकी काही लशींचा विपरीत परिणाम झाल्याचे ज्यांच्यावर चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी काहींनी म्हटले आहे. अर्थात कंपन्यांनी हा आरोप फेटाळला आहे. तरी एवढ्या लशी येत असल्याने नेमकी कुठली घ्यावी याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. तो दूर होण्यासाठी थोडा अवधी जाईल. 2020 हे वर्ष कोरोनाचे होते, तर सन 2021 कोरोनावरील लशींचे असेल.
-समाधान पाटील