कर्जत : बातमीदार
शिवूर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत पंचायत समितीमधील कर्मचारी जनार्दन पानमंद यांनी आपल्या अन्य चार दिव्यांग सहकार्यांसह गुरुवारी (दि. 3) तोरणा किल्ला सर करून जागतिक अपंग दिन साजरा केला.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुणे येथील शिवूर्जा प्रतिष्ठानने गुरुवारी सह्याद्री पर्वतरांगेतील गरूडाचे घरटे म्हणून ओळख असलेल्या तोरणा किल्ल्याची मोहीम आयोजित केली होती. समुद्र सपाटीपासून 4604 फूट उंच असलेला तोरणा किल्ला चढताना आणि उतरताना भल्या भल्या ट्रेकरचा घाम निघतो, परंतु दिव्यांग व्यक्ती कमजोर नसून त्यांच्यातही प्रचंड ऊर्जा असते हे दाखविण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी या साहसी मोहिमेचे आयोजन केले होते.
मोहिमेसाठी राज्यातील शिवप्रेमी दिव्यांगांची निवड करण्यात आली होती. शिवाजी गाडे (औरंगाबाद), अंजली प्रधान (नाशिक), केशव भांगरे (अहमदनगर) आणि विनोद माहेर (पुणे) यांच्यासह कर्जत पंचायत समितीमधील लिपिक जनार्दन पानमंद या दिव्यांगांनी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजता वेल्हे गावातून तोरणा किल्ला चढाईस सुरुवात केली. अपंग असलेल्या पाच जणांनी तब्बल चार तासांच्या कठीण चढाईनंतर दुपारी 2 वाजता गडाचा पहिला दरवाजा गाठला. तेथे मेंगाई देवीच्या मंदिरात शिवाजी गाडे यांच्या हस्ते गडदेवतेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अपंग सहकार्यांनी गडावरील बुधला माची, झुंजार माचीसह सर्व ऐतिहासिक वास्तूंवर नतमस्तक होत तब्बल दोन तास गडफेरी केली.
संपूर्ण दुर्ग अभ्यास व भटकंतीनंतर सायंकाळी चारच्या सुमारास परतीचा प्रवास सुरू करून अवघ्या दोन तासांत या दिव्यांगांनी वेल्हे हे गड पायथ्याचे गाव गाठले. खडक, निसरड्या वाटा व कारवीच्या घनदाट जंगलातून चालताना या दिव्यांगांनी तब्बल 15 किलोमीटरपेक्षाही जास्त पायपीट केली. या दिव्यांग दुर्गवीरांची जिद्द आणि सामर्थ्याला सलाम केला जात आहे.