Breaking News

कृषी कायद्यांवरून विरोधकांची दुटप्पी भूमिका; भाजपने साधला निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करीत विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनात उडी घेतली आहे. यावरून भाजपने विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यांना निवडणुकांमध्ये सतत अपशय येत आहे. त्यामुळे ते सरकारच्या विरोधात उभे असून, त्यांना आपल्या जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. काँग्रेसने 2014च्या जाहीरनाम्यात एपीएमसी कायदा रद्द केला जाईल असे म्हटले होते तसेच राहुल गांधींनी 2013मध्ये काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कृषी बाजार समित्या मुक्त व्हाव्यात, असे राहुल म्हणाले होते. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसुद्धा नव्या कायद्याला विरोध करीत आहेत, मात्र ते केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांना एपीएमसी कायद्यात बदल करण्यासाठी पत्र लिहिले होते आणि शेतकर्‍यांना कधीही त्यांचा शेतमाल विकण्याचा हक्क असला पाहिजे असे या पत्रात नमूद केले होते, याकडे रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले आहे. याचबरोबर रविशंकर प्रसाद म्हणाले, या विरोधी पक्षांना शेतकरी संघटनाकडून बोलविले जात नाही. तरीही त्यांची जाण्याची इच्छा आहे. वेगवेगळ्या राज्यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कंत्राटी शेती वेळोवेळी राबविली. त्यात काँग्रेसशासित बहुतेक राज्ये होती, तर योगेंद्र यादव यांनी 2017मध्ये एपीएमसी कायद्यात का बदल केला जात नाही, असे ट्विट केले होते.

शरद पवारांची जुनी पत्रे व्हायरल

मुंबई : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकर्‍यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन केंद्रातील भाजप सरकारने गांभीर्याने घ्यावे; अन्यथा ते दिल्लीपुरते सीमित न राहता त्याची व्याप्ती देशभर पसरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. दरम्यान, सोशल मीडियावर पवारांची जुनी पत्रे व्हायरल झाली असून, या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करीत अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना ऑगस्ट 2010मध्ये त्यांनी लिहिलेले पत्र सध्या व्हायरल झाले आहे. याशिवाय पवारांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही नोव्हेंबर 2011मध्ये अशा आशयाचे पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी कृषी कायद्यातील सुधारणांसह खासगी गुंतवणूक, एपीएमसी कायद्यातील बदलाची गरज, सरकारी बाजार समित्यांसह खासगी बाजाराची गरजही व्यक्त केली होती. दरम्यान, शरद पवारांची जुनी पत्रे व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यांच्या टीका होत आहे.

हा तर अराजक निर्माण करण्याचा प्रकार : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी

मोदी सरकारचा विरोध करायचा म्हणून शेतकर्‍यांविषयीच्या कायद्यांचा निषेध केला जातो आहे. महाराष्ट्रात हे कायदे गेल्या अनेक वर्षांपासून लागू आहेत. जे जे पक्ष भारत बंदला पाठिंबा देत आहेत ते बहती गंगा में हात धोना या म्हणीला अनुसरून वागत आहेत. देशात एक अराजकाचे वातावरण तयार करायचे म्हणून ही परिस्थिती निर्माण केली गेली आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी आहे असे सांगून फडणवीस यांनी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऑगस्ट 2010मध्ये लिहिलेल्या पत्राचे उदाहरण दिले. शरद पवार यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवून एपीएमसी कायद्यात बदल करण्याची गरज आहे असे म्हटले आहे. हे पत्र फडणवीस यांनी वाचूनही दाखवले. शरद पवार यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यातही त्यांनी दरवर्षी देशात 55 हजार कोटींचा शेतमाल वाया जातो. ही मोठी हानी आहे. शेतमाल फक्त एपीएमसीमध्येच विकला गेला पाहिजे हा नियम आता बदलला जावा अशी मागणी केल्याचे नमूद आहे, हे फडणवीसांनी निदर्शनास आणले.शिवसेनेने तर फळे व भाजीपाला नियनमुक्त करण्यास समर्थन दिले होते. आजही ते नियमनमुक्त आहे. एपीएमसीमध्ये शेतकर्‍यांवर अन्याय कसा होतो आणि काय मार्ग काढला पाहिजे याबाबत खासदार विनायक राऊत यांनीही चर्चा केली होती. आता विरोधाला विरोध म्हणून विरोधक विरोध दर्शवित आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले.

महाआघाडीत धुसफूस सुरूच; राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले -थोरात

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यावरून महाआघाडीतील धुसफूस कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधींमध्ये सातत्याचा अभाव असून, पक्षात त्यांची स्वीकारार्हता आहे का हे पहावे लागेल, असे वक्तव्य शरद पवारांनी नुकतेच एका मुलाखतीत केले होते. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे. राहुल गांधींना पक्षात स्वीकारार्हता आहे. आमचे ते नेते आहेत, असे थोरात यांनी सांगितलेे.काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पवारांना दिलेल्या सूचक इशार्‍याचेही थोरात यांनी समर्थन केले आहे. आमच्या काँग्रेसजनांचे मत यशोमती ठाकूर यांनी मांडले आहे, असे ते म्हणाले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply