पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
पनवेल ः प्रतिनिधी
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध 70 सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये 10 एप्रिलला पाककलेची आवड असणार्यांसाठी स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेेतील विजेत्यांना सोमवारी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, आशा की किरण फाऊंडेशनच्या नूरजहाँ कुरेशी, रे एज्युकेशनच्या फाऊंडर आयेशा रणदिवे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेमध्ये व्हेज व नॉनव्हेज स्टार्टर पदार्थांचा समावेश होता. अनेक महिला व पुरुषांनीही स्पर्धेत सहभाग घेऊन भरघोस प्रतिसाद दिला. उत्कृष्ट पाक कलाकृती सादर करणार्या भगिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा घेऊन याचा निकाल जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे स्पर्धकांना त्यांनी बनवलेले पदार्थ होम डिलिव्हरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पनवेल, तळोजा, नवीन पनवेल येथून स्पर्धकांनी पदार्थ पाठविले होते. त्यानुसार परीक्षकांनी पदार्थांची चव घेऊन निकाल दिला.
प्रथम क्रमांक निगार आसिफ सुभेदार तळोजे यांनी चिकन फिश, चिकन चेक्स चटई, चिकन चीज ब्रेड बर्गर आणि चिकन फिंगर्स बनवून पटकावला, तर द्वितीय क्रमांक पनवेल कच्छी मोहल्ला येथे राहणारे नदीम कुंवारी यांनी चिकन क्रिस्पी, चिकन मलाई कटलेट, दही वडा हे पदार्थ बनवून पटकावला. तृतीय क्रमांकांच्या मानकरी भुसार मोहल्ला येथे राहणार्या तांबे आर्शिया अब्दुल अजीज यांनी चिकन नगेट्स बनविले होते. उत्तेजनार्थ बक्षीस नवीन पनवेल येथे राहणारे व जिंजर स्पाईस या प्रसिद्ध चायनीजचे आशिष गुप्ता यांनी चिकन पदार्थ बनवल्याने त्यांना जाहीर करण्यात आले.
महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या वेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सहचिटणीस केवल महाडिक, आशा की किरण फाऊंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, नवीन पनवेल उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, अमित पंडित, ओमकार महाडिक, रहीस शेख, सतीश झेंडे आदी उपस्थित होते.