कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
घरफोड्या करणार्या अट्टल पाच आरोपींना कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी आठ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 55 हजार 900 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील आय. पी. मार्केटिंग कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीचे ग्रील उचकटून अज्ञात चोरट्यांनी संगणक संच व ग्रास कटिंग मशीन चोरून नेल्याची फिर्याद पुंडलिक किसन ठोसर यांनी 13 जुलै रोजी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकातील उपनिरीक्षक सचिन गावडे, अंमलदार सुभाष पाटील, भूषण चौधरी, गणेश पाटील, अश्रुबा बेंद्रे यांनी तपास सुरू केला. खबर्याकडून मिळालेल्या माहितीच्या अधारे पोलिसांनी हुमगाव येथील एका इसमाला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने व त्याच्या हुमगाव येथील राहणार्या चार साथीदारांनी मिळून कर्जत शहर तसेच कडाव, गौळवाडी, जांभिवली, वैजनाथ, हुमगाव येथे मागील दोन वर्षांपासून आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली.
आठ गुन्ह्यांत आरोपींनी चोरलेली सोन्याची चैन, रोख रक्कम, ऍपल कंपनीचे दोन महागडे लॅपटॉप, एअरपॉड, एसर कंपनीचा संगणक संच, सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही, पाच बॅटर्या, गवत कापण्याचे मशीन, असता एकूण दोन लाख 55 हजार 900 रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.