धाटाव : प्रतिनिधी
निसर्ग चक्रिवादळाच्या तडाख्याने झालेल्या पडझडीची डागडूजी न झाल्याने रोहा तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांना सध्या अडचणीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे.
निसर्ग चक्रिवादळात रोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 198प्राथमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळात काही शाळांच्या छपरावरील पत्रे उडून गेले, तर काही शाळांचे दारे, खिडक्या मोडून पडल्या आहेत. काही शाळा काही शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तर काही शाळांत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे नाहीत, तर काही ठिकाणी शाळेचे फर्निचर, टेबल, खुर्च्यांचे नुकसान झाले आहे. वीज जोडणी अद्यापही मिळाली नसल्याने काही शाळांतील संगणक अजूनही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवावे कसे? विद्यार्थ्याना बसवायचे कोठे? असे प्रश्न तालुक्यातील शिक्षकांसमोर निर्माण झाले आहेत.
कोरोनानंतर आता हळूहळू जनजीवन सुधारत असल्याने राज्य सरकारने जिल्हाधिकार्यांना शाळा सुरू करण्याचे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पालक आणि स्थानिक शिक्षण समितीच्या सहमतीने रोहा तालुक्यातील काही प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र चक्रिवादळात नुकसान झालेल्या शाळांची अजूनही डागडूजी न झाल्याने या शाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नुकसानग्रस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकार व रायगड जिल्हा परिषदने तात्काळ फंड उपलब्ध करून द्यावा, करावे अशी मागणी स्थानिक शाळा कमिटीचे अध्यक्ष करीत आहेत.
पंचायत समितीच्या अभियंत्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार चक्रिवादळात माझ्या शाळेचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. मात्र शाळा दुरुस्तीसाठी अजूनही निधी मिळालेला नाही.
-प्रकाश पाटील, मुख्याध्यापक, राजिप शाळा महादेववाडी, ता. रोहा
चक्रीवादळामध्ये तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. मात्र नुकसानग्रस्त शाळांसाठी निधी प्राप्त झालेला नाही.
-साधूराम बांगर, गटशिक्षणाधिकारी, रोहा