Breaking News

ऑनलाइन पद्धतीने धान्यवाटपास रायगड रेशनिंग संघटनेचा विरोध

माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या काळात धान्य दुकानदार व ग्राहकांचा थेट संपर्क येऊ नये म्हणून धान्यवाटप ऑफलाइनने करण्याची परवानगी पुरवठा विभागाने दिली होती, परंतु आता हे आदेश पुन्हा बदलून ऑनलाइनने मशिनवर अंगठा घेऊन धान्य पुरवठा करण्याचे आदेश मिळाले आहेत. सध्या रायगड जिल्ह्यात कोरोनाचे शंभरहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी पनवेलमधील धान्य दुकानदाराला धान्य वाटप करताना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे या निर्णयाविरोधात रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.

रायगड जिल्हा मुंबई-पुण्याला लागून असल्याने जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यातच ऑनलाइन पद्धतीने वाटप करताना नागरिक व दुकानदारांचा थेट संपर्क येणार आहे. त्यामुळे दुकानदारांची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे, त्यांचा विमा काढणे अपेक्षित होते, परंतु त्या गोष्टी न करता उलट शासनाने ऑनलाइन पद्धत राबवून दुकानदार व ग्राहकांचा त्रास वाढवला आहे. रेशनवरील धान्य वाटप करताना आता नेटची उपलब्धतादेखील आवश्यक आहे, नाहीतर ग्राहकांना हेलपाटे मारावे लागणार आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भावात शासनाच्या या निर्णयामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेने थेट मुख्यमंत्री आणि अन्नधान्य पुरवठा मंत्र्यांना निवेदन देत या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply