Breaking News

निवड चाचणी कबड्डी स्पर्धा : सह्याद्री, वक्रतुंड, जागर, संघर्ष संघांची आगेकूच

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात सह्याद्री मित्र मंडळ, वक्रतुंड क्रीडा मंडळ, जागर क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला, तर महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, नवशक्ती स्पोर्ट्स क्लब यांनी तिसरी

फेरी गाठली.

नेहरू नगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमार गटाच्या तिसर्‍या फेरीच्या सामन्यात सह्याद्री मंडळाने 12-14 अशा पिछाडीवरून पार्ले स्पोर्ट्सचा प्रतिकार 43-23 असा मोडून काढला. अभिषेक गिरी, अभिषेक गुरव यांनी सुरुवात झोकात करीत मध्यांतराला दोन गुणांची आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात त्यांचा खेळ ढेपालला. याचा फायदा घेत सह्याद्रीच्या भरत करंगुटकर, अजय मेमण यांनी आपले आक्रमण तेज करीत भराभर गुण वसूल करीत संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.

वक्रतुंड क्रीडा मंडळाने वीर परशुराम मंडळाचे आव्हान 35-07 असे लीलया परतवून लावला. वक्रतुंडच्या साईराम लोहोटे, मिथिलेश गावडे यांनी सुरुवातच अशी जोरदार केली की पहिल्याच डावात 17-03अशी भक्कम आघाडी घेतली. दुसर्‍या डावात तोच जोश कायम ठेवत विण्याचा मार्ग सोपा केला. वीर परशुरामचा दीप मोरे बरा खेळला. जागर क्रीडा मंडळाने वायएमसीयूचा 29-18 असा पाडाव करीत आगेकूच केली. विग्नेश पवार, रोहित आतिग्रे या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघाकडून जयेश सोलंकी, राहुल अहिरे बरे खेळले. अभिषेक सोलंकी, करण सोनावणे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या जोरावर संघर्ष क्रीडा मंडळाने उत्कर्ष क्रीडा मंडळाला 27-14 असे नमवित चौथी फेरी गाठली. उत्कर्ष कडून  मनीष सावंत, अमर गुरव यांचा खेळ संघाला विजयी करण्यास कमी पडला.

महिला गटाच्या दुसर्‍या फेरीत स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने ओम साई महिला मंडळाचा 51-12 असा धुव्वा उडविला. मध्यांतराला 25-04 अशी आघाडी घेणार्‍या स्वराज्यच्या विजयाचे श्रेय स्मिता पांचाळ, सोनल माघाडे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. ओमसाईची प्राजक्ता चव्हाण बरी खेळली. दुसर्‍या सामन्यात नवशक्ती स्पोर्ट्सने अटीतटीच्या लढतीत 22-20 अशी मात केली. बेबी जाधवच्या चढाया त्याला रिबेका गवारेची मिळालेली पकडीची साथ यामुळे नवशक्तीने मध्यांतराला 15-10 अशी आघाडी घेतली होती, पण उत्तरार्धात टागोरनगरच्या नेहा आणि सायली या फाटक भगिनींनी चतुरस्त्र खेळ करीत सामन्यात रंगत निर्माण केली. पण संघाला विजयी करण्यात त्या कमी पडल्या. प्रथम श्रेणी (अ ) गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने ओवळी क्रीडा मंडळाला 35-12 असे सहज नमविले. स्वस्तिकच्या विजयाचे श्रेय सुयोग झारापकर, अस्लम शेख यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. ओवळीचा स्वप्नील रेळेकर चमकला. सत्यम सेवा मंडळाने जय भवानी नवतरुण मंडळाला 20-16 असे पराभूत केले. सुरज जाधव, ओंकार रेवणे यांनी आक्रमक खेळ करीत विश्रांतीला 12-05 अशी आघाडी मिळवून दिली होती. विश्रांतीनंतर जय भवानीच्या अभिमन्यू चव्हाण, राहुल अहिरे यांनी आपला खेळ उंचावत सामन्यात चुरस निर्माण केली, पण सत्यमला विज्यापासून रोखण्यात यश आले नाही.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply