नव्या वर्षात नवे संकल्प करण्याची पद्धत आहे. 2020 या वर्षात जेवढी चर्चा कोरोना साथीची झाली तेवढीच वैयक्तिक आणि देशाच्या अर्थकारणाची झाली. अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले तर अनेक नागरिकांनी या काळातही गुंतवणुकीच्या मार्गाने पैसा कमावला. याचा अर्थ त्यांनी त्यांचे आर्थिक नियोजन केले. त्याचा दुसरा अर्थ त्यांनी आपल्या आयुष्यात काही आर्थिक संकल्प केले होते, म्हणूनच ते असे नियोजन करू शकले. आपणही नव्या वर्षाच्या निमित्ताने असे संकल्प केले पाहिजेत. ते करण्यासाठी आपल्याला एक दिशा मिळावी, म्हणून 2021 चे स्वागत करताना 21 आर्थिक संकल्प येथे देत आहे. असे काही संकल्प केले तरच आपल्या मनात भविष्यातील आर्थिक असुरक्षितता दूर होईल.
- गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन ही आयुष्याच्या शेवटच्या काळात करण्याची बाब आहे, असा अनेकांचा समज आहे. त्यापासून दूर राहीन आणि कमाईला लागले की म्हणजे तरुणपणातच या दोन्ही गोष्टी
सुरू करीन. - कुटुंबाचा आरोग्य विमा काढणे, ही सर्वात पहिली गुंतवणूक असली पाहिजे. तो लवकरात लवकर काढून घेईन. कोरोना साथीच्या काळात आरोग्य विम्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहेच.
- पॅन, आधार, डेबिट कार्ड आणि लायसनच्या कॉपी काढून त्या महत्त्वाच्या कागदपत्रांत ठेवून देईन. डीजीलॉकर या अॅपमध्ये त्या ठेवल्या तर ही कागदपत्रे सोबत ठेवण्याची आता गरज राहिलेली नाही. या कागदपत्रांची डिजिटल कॉपी अधिकृत आहे, असे सरकारने जाहीर केले आहे.
- सर्व बँका, सर्व गुंतवणुकीशी पॅन कार्ड – आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर ते करून टाकीन. म्हणजे गुंतवणूक करताना तसेच काढून घेताना किंवा कोणतीही कार्यालयीन कामे करताना अडचण येणार नाही.
- म्युच्युअल फंड, आयपीओ आणि शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची असल्यास त्यासाठी बंधनकारक असलेले डीमॅट खाते काढून स्वत:च्या नावानेच गुंतवणूक करीन. आणि त्याचे परिणाम आधी समजून घेईन. ही सर्व गुंतवणूक सुरुवातीस आर्थिक सल्लागार किंवा गुंतवणूक कळणार्या मित्रामार्फत करीन. जी रक्कम नजीकच्या भविष्यात लागणार आहे, ती जोखिमीच्या गुंतवणुकीत अडविणार नाही.
- क्रेडीट कार्ड शक्यतो वापरणार नाही आणि वापरले तरी एकच वापरेन. त्याचे हप्ते कधीच थकवू देणार नाही. कारण त्याच्या व्याजाचे दर अजिबात परवडणारे नाहीत.
- मोबाइल बील, वीज बील, महापालिका कर, विमा हे डिजिटल पद्धतीने भरायला सुरुवात करेन, रेल्वे आणि बसचे तिकीट ऑनलाइन काढीन, ज्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो. शिवाय त्याचे वेगळे रेकॉर्ड ठेवण्याची गरज राहात नाही. मात्र या व्यवहारात जे पासवर्ड वापरले जातात, ते विशिष्ट काळाने बदलत राहीन आणि ते बदल एका छोट्या डायरीत लिहून ठेवेन. ती डायरी कधीच घराबाहेर नेणार नाही. बँक किंवा क्रेडीट कार्ड कंपनीकडून फोन करतो, असे सांगून युजर आयडी, पासवर्ड, जन्मगाव आणि जन्म तारीख विचारणार्या फोनवर काहीही माहिती देणार नाही.
- डिजिटल व्यवहारासाठी ऑनलाइन बँकिंगसारखा एक पर्याय आणि एकच अॅप वापरीन. डिजिटलचे सर्व पर्याय वापरण्याचा मोह बाजूला ठेवीन. कॅशबॅकसारख्या मार्केटिंगच्या फेर्यात अडकून अनेक अॅप वापरणार नाही.
- गरज नसलेल्या वस्तू किंवा सेवा केवळ डिजिटली आकर्षक दिसतात म्हणून खरेदी करणार नाही. विशेषतः मोठी खरेदी करताना तिची आपल्याला खरोखरच गरज आहे का, ती आपण नियमित वापरणार
आहोत का, याचा दहा वेळा विचार करीन. - कमी काळात अधिक लाभ होतो म्हणून ज्या अनेक योजना सांगितल्या जातात किंवा त्यात पैसे टाकण्याचा सल्ला दिला जातो, त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. रिझर्व बँक, इर्डा आणि सेबीचे तसेच अशा सरकारी व्यवस्थेचे नियंत्रण नसलेल्या गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांपासून दूर राहीन.
- आपण व्यवहार करत असलेल्या बँका, गुंतवणूक, जीवनविमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घराची आणि इतर मालमत्तेचे कागदपत्र एकत्र ठेवून त्याच्या नोंदी एका डायरीत करून ठेवीन. बँक खात्यांची संख्या वाढली असल्यास ती कमी करीन.
- काळानुसार निर्माण झालेल्या गुंतवणुकीच्या अनेक उत्कृष्ट पर्यायांचा विचार करून गुंतवणुकीच्या नव्या आणि कायदेशीर साधनांमध्ये गुंतवणुकीला प्रारंभ करीन.
- गुंतवणुकीतील परंपरेचे उदाहरण म्हणजे सोन्यामध्ये होत असणारी मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक. गरजेपुरते दागदागिने घेणे हे योग्य. परंतु कमावलेले पैसे सातत्याने याच प्रकारात गुंतवणे टाळेन.
- पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त प्रॉपर्टीज (घर, फ्लॅट, शेतजमीन, दुकानासाठी गाळा, ऑफिससाठी जागा) करून ठेवण्याकडे अनेकांचा कल असतो. पण या प्रकारची गुंतवणूक मोडण्याची वेळ आली तर ती वेळखाऊ असते, याचे भान ठेवीन.
- विमा निवडताना बहुतांशी वेळा तो किती परतावा देणार आहे, याचा विचार करूनच विमा खरेदी केला जातो. प्रामुख्याने आपले वय लक्षात घेऊन आपल्यावर असणार्या कुटुंबाच्या जबाबदार्या व भविष्यातील उत्पन्नाची सांगड घालत संरक्षण म्हणूनच शुद्ध विमा म्हणजे टर्म विमा खरेदी करण्यास प्राधान्य देईन. गुंतवणूक म्हणून विमा खरेदी करणार नाही.
- उत्पन्नाच्या 50 ते 60 टक्के भाग मासिक हप्त्यापोटी (ईएमआय) अनेकवेळा दिला जातो. त्यामुळे मासिक हप्ते पगाराचा मोठा भाग खाऊन टाकत असतात. एक स्वतःचे घर सोडले तर अन्य कुठल्याही गोष्टी शक्यतो कर्ज काढून खरेदी करणार नाही.
- पैशाचे योग्य नियोजन व खर्चाचे बजेट ठरवणे हे अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्न – बचत (गुंतवणूक) = खर्च हे सूत्र अंगीकारणार.
- अलीकडच्या काळात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा आणि निवृती वेतन याला अतिशय महत्त्व आले आहे. असे असले तरी माझ्या उत्पन्नाला आणि मानसिकतेला अधिक जोखीम असलेले पर्याय झेपत नसतील तर त्या मार्गाने जाणार नाही.
- अचानक येणार्या खर्चांसाठीचे नियोजन न करणे घातक ठरू शकते. यासाठी किमान काही रकमेची म्हणजे दोन ते तीन महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम कायम हाताशी ठेवीन.
- गुंतवणूक करत असताना गुंतवणूक तज्ञांचे मत व त्यांची मदत न घेता आपल्या मित्र परिवाराकडून अथवा नातेवाइकांकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूक केली जाते. सातत्याने होणार्या
आर्थिक नियमातील बदलांमुळे व नवनवीन पर्यायांची उपलब्धता, यामुळे माहिती न घेता गुंतवणूक करणे टाळेल. - आपण केलेल्या गुंतवणुकीची माहिती घरातील आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला असलीच पाहिजे. ती असावी, यासाठी गुंतवणुकीविषयी त्या व्यक्तीशी अधूनमधून या विषयावर बोलत राहीन. वय अधिक असल्यास मृत्यूपत्र तयार करणे आणि सर्व गुंतवणुकीला वारसदारांची नावे लावलेली आहेत ना, याची खात्री करून घेईन.
-यमाजी मालकर (ymalkar@gmail.com)