मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे, तसेच यशोमती ठाकूर यांच्यापुढे काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी महात्मा होतं का? असा सवाल करीत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनतं का? सोनिया नाव धारण करून न्टोनीया माईनो यांचे वास्तव लपणार आहे का? आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलते का? गांधी घराण्याची गुलामगिरी करणार्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या सार्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात आणि प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असे शिवराय कुळकर्णी म्हणाली. शेतकर्यांच्या जमिनी हडपणार्या आणि प्रियांका रॉबर्ट वाड्रा यांच्या तिजोर्या भरणार्या काँग्रेसी गुलामांनी शेतकरी हिताचा पुळका दाखवू नये. काँग्रेसच्या सत्ताकाळात रॉबर्ट वाड्रा यांनी शेतकर्यांच्या जमिनी गिळल्याचा इतिहास ताजा आहे. काँग्रेसने नाहक पुतनामावशीचे प्रेम दाखवू नये, असा टोला त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला. मोदींवर टीका करून काँग्रेसमध्ये आणखी वरचे पद मिळते, या अनुभवातून यशोमती ठाकूर आपल्या मंत्रीपदाची चुणूक दाखवण्याऐवजी रोज नित्यनेमाने मोदींवर शाब्दिक हल्ला चढवत असतात. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचा इतिहास आम्हाला पुन्हा उगाळायला लावू नका. स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि सर्वांना कर्जमाफीचा लाभही नाही. यशोमती ठाकूर यांनी प्रथम त्यावर लक्ष द्यावे. त्यांनी प्रथम जिल्ह्यातल्या शेतकर्यांच्या व राज्यातील महिलांवर होणार्या अत्याचाराच्या समस्या सोडवून दाखवाव्या, असे आव्हान शिवराय कुळकर्णी यांनी दिले.