कर्जत : बातमीदार
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील किल्ला असलेल्या कोथळीगड (ता. कर्जत) येथील पाणी आटले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात गडदर्शनासाठी येणार्या पर्यटकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. या गडाच्या पायथ्याशी राहणार्या स्थानिक लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, पेठ गावातील पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन तेथे एक विहीर मंजूर करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या कर्जत तालुक्यातील आंबिवली गावाच्या मागे कोथळीगड हा किल्ला उभा आहे. किल्ल्यावरून एकाच वेळी रायगड आणि पुणे जिल्ह्यावर लक्ष ठेवता येत असल्याने स्वराज्यात या किल्ल्याला महत्त्व होते. सह्याद्रीच्या एका पहाडावर पेठ हे गाव वसले असून, दुसर्या पहाडावर पेठ किल्ला म्हणजे कोथळीगड आजही दिमाखात उभा आहे. या कोथळीगडावर दरवर्षी गडकिल्ले प्रेमी मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या मागणीनुसार स्थानिक ग्रामस्थ त्यांच्या राहण्याची आणि न्याहारीची व्यवस्था करीत असतात. या किल्ल्यावर तीन पाण्याचे कुंड आहेत, पण वापराविना त्या कुंडांमधील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पर्यटक हे ग्रामस्थ व्यवस्था करीत असलेल्या पाण्याचा वापर करतात.
पेठ गावात असलेली विहीर सध्या आटली आहे. विहिरीत पाण्याचा थेंब राहिला नसल्याने पेठ ग्रामस्थांवर पाण्याचे संकट घोंघावत आहे. हा प्रश्न केवळ पेठ ग्रामस्थांचा नाही, तर तेथे पर्यटनासाठी आणि किल्ला पाहण्यासाठी येणार्या गडप्रेमी यांच्यासाठी कठीण बनला आहे. कारण पेठ गावात पाणी नाही, असे समजल्यावर पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येणार नाहीत आणि ज्यावर अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे, त्या पेठ ग्रामस्थांचा आर्थिक स्रोत बंद होणार आहे. पेठ हे गाव उंचावर आणि दुर्गम भागात आहे. त्या ठिकाणी कोणतेही चारचाकी वाहन जात नाही. तेथे टँकरचे पाणी कसे पोहचविणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे या वर्षी पेठ गावावर आलेले पाणीटंचाईचे संकट ग्रामस्थांची परीक्षा घेणारे आहे.
— ऐतिहासिक कोथळीगड पाहण्यासाठी येणार्यांची सेवा आमचे पेठ ग्रामस्थ करीत असतात, मात्र पाणीच नाही म्हटल्यावर किल्ला पाहण्यासाठी कोण येणार? यांची भीती ग्रामस्थांना वाटत आहे. त्यामुळे रोजगार बुडणार आणि पावसाळ्यात कसे राहायचे? हा प्रश्न देखील सतावत आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थ या उन्हळ्यात गाव सोडून जाऊ लागले आहेत.
-अशोक सावंत, ग्रामस्थ, पेठ, ता. कर्जत