पनवेल, मुंबई : प्रतिनिधी
काळानुसार होणार्या बदलाची योग्य वेळी चाहूल लागून संगणकाचे ज्ञान घराघरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थापकीय अध्यक्ष व तत्कालीन सी-डॅकचे प्रमुख विवेक सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट 1999 रोजी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी या संस्थेची स्थापना केली. त्यामुळे शाहू इन्स्टिट्यूट ही लोकनेते रामशेठ ठाकूर यांची एक विचारी दूरदृष्टी असल्याचे मत शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक जयंत भगत यांनी व्यक्त केले. साधारणतः दोन वर्ष सी-डॅकबरोबर काम करताना महाराष्ट्र शासन व राज्यातील नऊ विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक सावंत यांनी एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची 20 ऑगस्ट 2001 रोजी स्थापना करून राज्यातील जवळपास 3000 संगणक प्रशिक्षण केंद्रांद्वारे हे प्रशिक्षण खेडोपाड्यातील, वाड्या-वस्तीवरील, तळागाळातील जनतेपर्यंत माफक दरात पोहचविण्याचे कार्य केले व त्यातीलच एक भाग म्हणून शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कार्यरत झाली. आज एमकेसीएलची पाच हजारांहून अधिक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रात कार्यरत आहेत. एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा 22वा वर्धापन दिन मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये नुकताच मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी वैज्ञानिक श्री. जोशी, डॉ. अनिल काकोडकर, निशिगंधा वाड-देऊळगावकर, एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामत, संचालक मंडळ, विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक याचबरोबर महाराष्ट्रातील 900हून अधिक केंद्र संचालक उपस्थित होते. 2002पासून शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये एमकेसीएलचे यशस्वी प्रशिक्षण सुरू असतानाच पुढील टप्पा म्हणजेच एमकेसीएलने 2004मध्ये शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीला रायगड जिल्हास्तरीय प्रमुख केंद्र म्हणून नेमणूक केली. हे काम करीत असताना एमएस-सीआयटी कोर्सचा योग्य तो प्रसार व प्रचार करून जिल्ह्यामध्ये एमएस-सीआयटीच्या शंभरहून अधिक केंद्रांना मान्यता मिळवून देऊन एमकेसीएलच्या व अध्ययन केंद्राचा व्यवसाय वृद्धिंगत केला. शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीची ही प्रगती बघून एमकेसीएलने परत एकदा कोकण विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती केली. विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये एमकेसीएलचे जास्तीत जास्त उपक्रम राबविण्याचे धोरण ठरविले गेले व आज कोकण विभागात 340हून अधिक संगणक प्रशिक्षण संस्था सुरू असताना एमएस-सीआयटीबरोबर एमकेसीएलच्या केएलआयसी अभ्यासक्रमाद्वारे अधिकाधिक प्रवेश वाढविण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जात आहेत. या 22 वर्षांच्या कालखंडामध्ये शाहू इन्स्टिट्यूटमधून 12 हजारांहून अधिक विद्यार्थांनी संगणक प्रशिक्षण प्राप्त केले आहे. आज 21व्या शतकात प्रत्येक क्षेत्रामध्ये नितांत गरज असणारे संगणकाचे ज्ञान आपल्या भागातील सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासंबंधीची दूरदृष्टी लोकेनते रामशेठ ठाकूर यांनी 22 वर्षांपूर्वीच ओळखली व त्यामुळे अशा हजारो तरुणांना आपले करिअर घडविण्यास मदत झाली. शाहू इन्स्टिट्यूटने कोकण विभागाची जबाबदारी सांभाळतानाच बिहार राज्यातील चार जिल्हे व गोवा राज्यामध्येही एमकेसीएलबरोबर काम करताना एमकेसीएलसह प्रत्येक केंद्राचा व्यवसाय वृद्धींगत होण्याचे यशस्वी प्रयत्न करीत असताना या सर्व उपक्रमांसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अनमोल मार्गदर्शन, आमदार प्रशांत ठाकूर यांचे नियमित व मार्मिक अवलोकन व जेव्हा जेथे आवश्यक असेल त्या ठिकाणी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर व माजी नगरसेवक अनिल भगत यांची मोलाची साथ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक मंगेश जाधव, संतोष कोलते, प्रणय तेली, शाहू इन्स्टिट्यूटचे सर्व अध्ययन वर्ग व कोकण विभागातील सर्व अध्ययन केंद्रांचे समन्वयक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 20 ऑगस्ट 2022 रोजी एमकेसीएलच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त शाहू इन्स्टिट्यूटच्या 22व्या वर्षांच्या वाटचालीत एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामत यांच्याकडून शाहू इन्स्टिट्यूटचा यथोचित गौरव करण्यात आला, अशी माहितीही शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक जयंत भगत यांनी दिली.