रोपांची विक्री वाढली
पाली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या राष्ट्रीय संकटाचा फटका अनेक लहान मोठ्या उद्योग-व्यवसायांना बसला. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच रोपवाटिकेतील रोपांची विक्री थांबली होती. परिणामी कोट्यवधींचे नुकसानही सहन करावे लागले, मात्र सध्या विकसकांची सुरू झालेली कामे तसेच नाताळच्या सुट्यांमध्ये पर्यटकांची रोपांना मागणी वाढली आहे. त्यामुळे पाली सुधागडात रोपवाटिका व्यवसाय तेजीत आला आहे. सध्या येथील रोपवाटिका व्यावसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे.
फळझाडांची अभिवृद्धी करून त्यांचे काही काळ काळजीपूर्वक संगोपन करण्यात येणार्या ठिकाणास रोपवाटिका असे म्हणतात. वनस्पतीची अभिवृद्धी हे शास्त्र आणि कला यांचा संगम अथवा मिश्रण आहे. चांगल्या झाडाच्या बियांपासून चांगली झाडे तयार होतात हे निसर्गाने आपल्याला शिकवले आहे. पाली सुधागडसह जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अनेक रोपवाटिका आहेत. सर्वांचा मिळून वर्षाला कोट्यवधींचा व्यवसाय आहे, मात्र लॉकडाऊनच्या काळात तब्बल सात ते आठ महिन्यांत जिल्ह्यातील असंख्य रोपवाटिकांतील झाडे व रोपे सुकून गेली किंवा प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याने निरुपयोगी झाली.
जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेही मोठी हानी झाली. पावसाचा हंगाम लॉकडाऊनमुळे निघून गेला. परिणामी रोपवाटिकाधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले, मात्र आता परिस्थितीत सुधारणा होत आहे. रोपवाटिका नव्याने उभ्या राहत आहेत. त्याबरोबरच काही ठिकाणी नव्याने रोपवाटिका सुरू झाल्या आहेत. पाली-खोपोली मार्गावर नुकत्याच दोन नवीन रोपवाटिका सुरू झाल्या आहेत. तेथे रोपे व झाडे खरेदी करणार्यांची मोठी गर्दी होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून नव्याने कोणतीही झाडे किंवा रोपे लावली नाहीत, तसेच बागकामदेखील फार प्रमाणात केले नाही, मात्र आता रोपवाटिकांमधून झाडे खरेदी करीत आहोत, असे पालीतील बागकामप्रेमी अॅड. चेतन भउड यांनी सांगितले.
लँडस्केपिंगची कामे सुरू झाली आहेत, तसेच लॉकडाऊननंतर लोक आता बाहेर पडू लागले आहेत. नाताळची सुटी व नववर्षाच्या स्वागतासाठी लोक फिरण्यास बाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी आहे आणि त्यातील वृक्षप्रेमी लोक नर्सरीला आवर्जून भेट देऊन खरेदी करतात. असेच सुरू राहिले तर नर्सरींना पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.
-अमित निंबाळकर, मालक, ग्रीन टच लँडस्केप अॅण्ड नर्सरी, पाली
लॉकडाऊनमुळे बागकामे खोळंबली होती, मात्र आता कामे मिळू लागली आहेत. त्यामुळे शोभीवंत व इतर झाडे तसेच लॉन आदींची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.
-ऋषी झा, मालक, ध्रुव अॅग्रो व लँडस्केप, सुधागड
विशिष्ट रोपांची कमतरता
बरीच महिने नवीन रोपांची निर्मिती झाली नसल्याने व हंगाम गेल्याने विशिष्ट शोभीवंत, फळ आणि फुलझाडांच्या रोपांचा काही प्रमाणात तुटवडा भेडसावत आहे. बर्याच ठिकाणी विविध रंगांची गुलाबाची रोपे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्राहक काही प्रमाणात नाराज आहेत.