पेण : प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी पेण तालुक्यांसह खारेपाट भागातील कारखान्यात गणेशाच्या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. गतवर्षापेक्षा यावर्षी खारेपाट भागातील ज्येष्ठांसह तरुण, तसेच महिला मंडळी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने प्रदूषण विरहित गणेशमूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. या मूर्तीना मागणी जास्त असल्याने येथील मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिससह मातीच्या गणपतीची मागणी जास्त असते, परंतु यामुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने प्रदूषणविरहित गणेशमूर्ती तयार करण्याचा विचार करून लाल मातीपासून ट्री गणेशमूर्ती म्हणजे लाल मातीपासून गणेशमूर्ती बनवली जाते व त्यासोबत गणेशमूर्तीच्या आकाराची कुंडी व वनस्पतीची बी दिली जाते. जेव्हा आपण गणेशमूर्तीचे विसर्जन करतो, तेव्हा ही गणेशमूर्ती या कुंडीमध्ये विसर्जित केली जाते, तसेच विसर्जन केल्यानंतर ती वनस्पतीची बी या कुंडीत टाकून काही दिवसांनी कुंडीत छानसे रोपटे तयार होते. यामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन तयार झालेल्या वनस्पतीपासून निसर्गात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते.
पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. यंदा किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाशी खारेपाट भागात वाशी, कणे, बोझें, वढाव, दिव, भाल येथील 80 टक्के तरुण मंडळी शिक्षण असूनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्यात वर्षभर व्यस्त आहेत. यातून दीड ते दोन हजार लोकांना रोजगार मिळतो. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे खारेपाट भागात 10 ते 12 कोटींची वार्षिक उलाढाल होते. पेणसह खारेपाट भागात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीची निर्मिती करणारे 500 च्या अधिक कारखान्यांमध्ये मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रंगबेरंगी गणेशमूर्ती तयार होत असताना दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांची मागणी वाढली आहे. प्रदूषणविरहित ट्री गणेशमूर्ती या पेणमधून कर्नाटक, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह आशिया व युरोप खंडातील अनेक देशांमध्ये जात आहेत.