पोलादपूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार आणि दै. राम प्रहरचे पोलादपूर प्रतिनिधी शैलेश वसंत पालकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी पालकर यांची नियुक्ती केल्याचे नियुक्तिपत्रामध्ये प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी नमूद केले आहे. या वेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बनकर (खेड) आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेतर्फे 20 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये राज्यातील पत्रकारांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. प्रिंट मीडियाबरोबरच वेब मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींना या संघटनेत सभासद होता येणार असून, रायगड जिल्ह्यासह कोकणातील पत्रकारांनी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन नवनियुक्त रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर (मो. क्र. 9226849185) यांनी केले आहे.