नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने आंदोलनातून केली होती. आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने व्हॅट कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यावर देशभरात पेटोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 5 व 10 रुपयांनी कपात झाली आहे. त्यानंतर देशातील अनेक राज्यांनी व्हॅट कमी केला असून त्या प्रत्येक राज्यात पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत, मात्र महाराष्ट्रात अद्यापही व्हॅट कमी करण्यात आला नाही. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य सरकारवर निशाणा साधला. ’केंद्राने पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये कमी केल्यावर 25 राज्यांनी ते दर आणखी कमी केले. महाराष्ट्रात का नाही?’, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे.
काँग्रेसचीही मुख्यमंत्र्यांकडे करकपातीची मागणी
मुंबई ः केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला, त्याच पद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान यांनी म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तूंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच राज्यातील जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …