Breaking News

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज ग्रामसभा

गावांच्या विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम

अलिबाग : प्रतिनिधी

खेडेगावांच्या शाश्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असून, देशातील सर्व गावांचा 2030पर्यंत शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या नवीन ध्येय निश्चितीसाठी केंद्राने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात सुधारणा केली आहे. त्यानुसार पंचायत राज दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 24) रायगड जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत गावांच्या शाश्वत विकासासाठी 24 एप्रिल या पंचायत राज दिनाचे औचित्य साधून, रायगड जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. आयोजित केलेल्या ग्रामसभेत नऊ कलमी कार्यक्रमापैकी किमान एक संकल्प व अधिक तीन संकल्प राबविण्याचा ठराव ग्रामसभेत पारित करायचा आहे. केंद्र शासनाच्या नऊ कलमी कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 नऊ कलमी कार्यक्रम

गरीबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृध्दीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव.

 शेतकर्‍यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्यासाठी ‘किसान भागिदारी प्राथमिकता हमारी‘ अभियान राबवण्यात येणार आहे. सदर अभियान 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत राबवण्यात येणार आहे. यासाठी रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजनही करण्यात येणार आहे. तसेच ज्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत किसान क्रेडिट कार्ड मिळालेले नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply