अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे येथील कृष्ण महल इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये मंगळवारी (दि. 20) संध्याकाळी अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीचा भडका उडाला आणि या आगीत पार्लरमधील फर्निचर जळून खाक झाले. इतर वस्तूंनाही आगीची झळ पोहचली.
सुरुवातीला तिथे हजर असलेल्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात आली नाही. म्हणून अलिबाग नगरपालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले. या बंबाने थोड्याच वेळात आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ही आग शॉर्ट सर्कीटने लागली असावी असा अंदाज आहे.