मागील आठवड्यातील लेखात आपण सेन्सेक्सचा 100 ते 50 हजार हा प्रवास पहिला. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा प्रवास निश्चितच रोमांचक असाच आहे. मी लेखात नमूद केल्याप्रमाणं इतर कोणत्याही मालमत्ता प्रकारात ह्या गुंतवणूक पर्यायानं अधिक परतावा दिलेला दिसतो. परंतु याबाबत अनेकांच्या मनात शंका असू शकतात, अशा शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा हा लेखप्रपंच.
जेव्हा 2009 मध्ये आम्ही पुणे आणि आजूबाजूच्या उपनगरांत एक सर्व्हे केला होता आणि ज्यामध्ये पुढील 10 वर्षांसाठी गुंतवणूक पर्याय निवडण्यास सांगितलं होतं तेव्हा रिअल इस्टेट क्षेत्राला प्रथम प्राधान्य व सोन्यामधील गुंतवणुकीस दुसरं प्राधान्य असं मत नोंदवणार्यांची संख्या जवळपास 95 टक्क्यांपेक्षा अधिक होती. अर्थातच त्यामागील पाच ते सात वर्षे रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजी कारणीभूत आहे. 21व्या शतकातील पहिल्या दशकात रिअल इस्टेटचे भाव अक्षरशः आकाशाला गवसणी घालू लागले होते. तरीही मागील 35-40 वर्षांचा विचार केल्यास शेअर बाजारातील परताव्याला कोणताही ऍसेट क्लास मात देऊ शकला नाहीये.
याबाबतीत सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या आईच्या बाबतीत घडलेला किस्सा इथं वाचकांसाठी नमूद करतो. त्यांच्या आई श्रीमती उर्मिला झुनझुनवाला यांनी आपली नाराजी व्यक्त केली की ते (राकेशजी) त्यांची गुंतवणूक जमीनजुमला यांच्यामध्ये न करता कागदांमध्येच (पूर्वीच्या काळी कागदी शेअर्स सर्टिफिकेट्स असायची) करतात. म्हणून आईचे मन राखण्यासाठी राकेशजींनी मुंबईच्या अति उच्चभ्रु अशा मलबार हिल परिसरात 2004 साली एक सदनिका खरेदी केली, ज्यासाठी त्यांनी आपल्याकडील क्रिसिल कंपनीचे 27 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. पुढं, 2015 मध्ये तो फ्लॅट त्यांनी सुमारे दुप्पट भावामध्ये विकला. परंतु तो फ्लॅट घेण्यासाठी जे 27 कोटींचे क्रिसिल कंपनीचे शेअर्स विकले होते त्यांची किंमत 2015 मध्ये 700 कोटी रुपये झाली होती आणि मागील 11 वर्षांत केवळ लाभांशापोटीचं करमुक्त उत्पन्न 50 कोटींचे असले असते.
अजून एक किस्सा माझ्याबाबतीत घडलेला सांगतो. गेल्या वर्षी टाळेबंदीच्या काळात एक कुटुंब माझ्यामार्फत त्यांच्या कॉलेजकुमार मुलाच्या नावे शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी आले. तेव्हा चर्चेच्या ओघात सेन्सेक्सनं मागील 40 वर्षांत कशाप्रकारे परतावा दिलाय हे सांगत होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी 1986 साली तीन लाख रुपयांत घेतलेल्या फ्लॅटची आजची किंमत सुमारे 80 लाखांच्या आसपास आहे, म्हणजे गेल्या 35 वर्षांमध्ये 27 पट परतावा. हे सांगत असताना हा परतावा अत्युच्च असल्याचे भाव त्यांच्या विजयी मुद्रेतून झळकत होते. परंतु, 1 एप्रिल 1986 रोजी 100 अंशांनी सुरू झालेल्या सेन्सेक्सनं मागील याच कालावधीमध्ये 400 पट परतावा दिलेला आहे. (100 ते 40 हजार). तर पुढील एका वर्षात 500 पट.
ही झाली रिअल इस्टेटशी तुलना. अजून एक मजेशीर बाब म्हणजे, 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर 2000 साली सोन्याचा भावदेखील चार हजारांच्या घरात होता आणि सेन्सेक्सदेखील. आणि मागील वर्षीच सोन्यानं 50 हजारांचा टप्पा ओलांडला होता आणि पुढील काही महिन्यांतच सेन्सेक्सनंदेखील 21 जानेवारी 2021 रोजी 50 हजार अंशांचा टप्पा गाठला. 21 वर्षांपूर्वी सोन्याचा भाव आणि सेन्सेक्स जवळपास समान पातळीवर होते आणि आतादेखील समान स्तरावर आहेत. 1999 मध्ये सोन्यात 4200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सरासरीने व्यवहार होत होते, तर एस अॅण्ड पी बीएसई सेन्सेक्स होता 4141. आणि आता 2021 मध्ये सोन्याचे दर 1999 मधील भावापेक्षा 12 पटीने वाढून 50 हजारांवर आहे तर दुसरीकडं सेन्सेक्सदेखील 12 पटीनं वाढून 50 हजारांवर पोहचला आहे (21 जानेवारी रोजी). म्हणजेच मागील 20-21 वर्षांत सोन्याचा परतावा सेन्सेक्सपेक्षा अधिक होता का? उत्तर – नाही. वरवर पाहता वरील गोष्टीवरून तसंच भासत असलं तरी सत्य परिस्थिती वेगळी आहे. कारण, सेन्सेक्सनं सोन्यापेक्षा 50 टक्के अधिक परतावा दिलेला आहे.
सेन्सेक्सचा परतावा मोजताना प्राईस रिटर्न इंडेक्स (झठख) गृहीत न धरता टोटल रिटर्न इंडेक्स (ढठख) हा गृहीत धरला जातो. पीआरआय केवळ भावातील वृद्धीचं मोजमापन करतं तर टीआरआयमध्ये लाभांश, व्याज आणि भांडवली नफ्यासह भावातील वाढ या गोष्टीदेखील समाविष्ट केल्या जातात. त्यामुळं गेल्या 21 वर्षांत सेन्सेक्स आणि सोन्याचे भाव सुमारे 4100-4200 रुपयांवरून सुमारे 50 हजार रुपयांवर गेले आहे, तर सेन्सेक्स टीआरआय जून 1999 रोजी असलेल्या 4356 अंशांवरून 21 जानेवारी 2021, अखेरीस 72222 झालेला आहे. म्हणजेच सेन्सेक्स (ढठख) सोन्याच्या किंमतींच्या तुलनेत साधारणपणे 45 टक्क्यांनी आघाडीवर आहे. इतर मालमत्ता पर्यायांबरोबर तुलना करताना टीआरआय परतावा मोजणं जास्त योग्य ठरू शकतो कारण अशामुळं शेअरच्या भाववाढीबरोबर मिळणारा लाभांश हादेखील गुंतवणूकदारास मिळणारा परतावाच असतो. त्यामुळं तूर्त तरी शेअर बाजार हाच गेल्या 40 वर्षांतील गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा देणारा पर्याय आहे, हे सिद्ध होतंय. गरज आहे योग्य वेळेस योग्य निर्णय साधण्याची.
सुपर शेअर- टीव्हीएस मोटर्स
मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजार पाच टक्क्यांनी कोसळला. शेअरच्या ताणल्या गेलेल्या किंमती, आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरण आणि उद्या मांडला जाणारा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प याचा सार्वत्रिक परिणाम बाजारावर झाला आणि बाजारात नफाखोरीस प्राधान्य दिलं गेलेलं दिसलं. तरी अशा बाजारातदेखील टीव्हीएस मोटर्सचा शेअर सुमारे 10 टक्क्यांनी वधारला आणि गेल्या आठवड्यातील सुपर शेअर ठरला. नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही निकालामध्ये कंपनीनं आतापर्यंतचं विक्रमी उत्पन्न नोंदवलं आहे. मागील वर्षातील सप्टेंबर ते डिसेंबर या तिमाहीपेक्षा 31 टक्के वाढ दिसत असून कंपनीचं या वर्षीच्या तिमाहीतील उत्पन्न 5391 कोटी रुपये असून विक्रीमध्येदेखील 20 टक्के वाढ नोंदवत कंपनीनं सुमारे 10 लाख वाहनांची विक्री या तिमाहीत केलेली दिसत आहे. कंपनीचा या तिमाहीतील निव्वळ नफा वाढून 266 कोटी रुपये झालेला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्सना मागील आठवड्यात चांगली मागणी होती. मागील शुक्रवारी 522 रुपयांच्या खाली बंद झालेल्या या शेअरचा भाव 590 रुपयांपर्यंत पोहचला होता. दैनिक तक्त्यावर 8 जानेवारी रोजी तेजीस पूरक रचना असल्यानं 513 रुपयांच्या वरती खरेदी करून पाच ते सात टक्के नफ्याचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं दिसतंय. केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सामान्य माणसाबरोबर बाजाराच्यादेखील काही अपेक्षा आहेतच. मागील दोन वर्षे भासणारी मंदी आणि त्यानंतर मागील वर्षभर आर्थिक उलाढाल नगण्य असताना मांडला जाणारा अर्थसंकल्प एकूणच मागील दशकातील सर्वांत आव्हानात्मक असा असणार आहे. त्यातून दिलासा व आशा बाळगणं गैर नाही, परंतु प्रत्येकालाच समाधानी करणं ही अशक्य बाब आहे आणि त्यावरच पुढील आठवड्यात शेअर बाजार कोलांट्या उड्या घेऊ शकतो, पाहू यात काय होतंय ते…
-प्रसाद ल. भावे