खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर
शुन्य ते पाच वर्षे वयोगटापर्यंत बालकांसाठी राबविली जाणारी पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 31)पासुन सुरू होत आहे. कोविडच्या परिस्थितीत यावर्षी ही मोहीम यशस्वी राबविण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आवाहन असणार आहे. पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य विभाग याकरिता सज्ज झाले आहे. पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांना तशाप्रकारच्या सूचनादेखील करण्यात आलेल्या आहेत.
पालिका क्षेत्रात एकूण 73 हजार 935 जणांची नोंदणी या लसीकरणासाठी करण्यात आलेली आहे. याकरिता 90 हजार पोलिओ डोस प्राप्त झालेले आहेत. कोविडमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे लहान मुलांना या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याबाबत पालकांमध्ये संभ्रमता निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आरोग्य विभाग याकरिता सज्ज झाले आहे. याकरिता कर्मचारी, पथक तसेच इतर सर्व तयारी पूर्ण झाल्याने हि मोहीम यशस्वी होईल असा विश्वास पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. या लसीकरणातून पाच वर्षे वयोगटातून एकही बालक सुटणार नाही. याबाबत खबरदारी घेतली जाणार आहे.
पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. या मोहिमेतील कर्मचारी देखील निश्चित झाले आहेत. त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. कोविड काळात सुरक्षित पोलिओ लसीकरणासाठी आमचे प्रयत्न आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम यशस्वीरित्या पार पडेल.
-डॉ. रेहाना मुजावर, आरोग्य अधिकारी, पनवेल महानगरपालिका
…अशी असेल प्रक्रिया
लसीकरणासाठी पालकांनी रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्याजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच वर्षे वयोगटा खालील मुलांना लसीकरणासाठी घेऊन जाणे गरजेचे आहे. रविवारी एक दिवस ही प्रक्रिया चालेल. इतर दिवशी घरोघरी, चौकात, एसटी स्टॅन्ड आदी ठिकाणी मोबाइल पथकांच्या मार्फत हे लसीकरण केले जाणार आहे.