नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत चार हजार 883 जणांना श्वानदंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास 70 हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणेप्रमाणे नवी मुंबईमधील नागरिकांनाही भटक्या श्वानांच्या उपद्रवास सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेने श्वान नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया वाढविल्या आहेत. यामुळे भटक्या श्वानांची वाढ रोखण्यात यश आले असले तरी श्वानदंशाच्या घटना कमी होत नव्हत्या. प्रत्येक वर्षी 10 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना श्वानांनी चावल्याची नोंद होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून श्वानदंशाचे प्रमाणही कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबरपर्यंत 4883 नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी ही संख्या 10482 होती. एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाला. नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावरही निर्बंध आले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही रात्रीच्या फिरण्यावर निर्बंध कायम राहिले आहेत. यामुळे श्वान चावण्याच्या घटना कमी झाल्याचे बोलले जात आहे. सहा वर्षांत 70 हजार जणांना श्वानांनी चावले आहे. सर्वाधिक 14556 घटना 2016-17 या वर्षात झाल्या आहेत. महानगरपालिकेने 2014पासून आतापर्यंत तब्बल 25131 श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. 22397 जणांवर उपचार केले आहेत. निर्बीजीकरण व उपचारावर सहा वर्षांत सात कोटी 66 लाख 59 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास 90 टक्के श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाली आहे.