मुंबई : प्रतिनिधी
सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोमवार (दि. 1)पासून अखेर पुन्हा एकदा लोकल धावणार आहे. अर्थात त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आवश्यक सेवा देणार्यांसाठी लोकलची दारे उघडी झाली. आता सामान्यांसाठी वेळेची मर्यादा घालून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.
ठरावीक वेळेतील प्रवासावरून मनसेची टीका
मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकल ट्रेनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोनाबरोबर सरकारचा ऐतिहासिक करार झाल्याचे म्हणत देशपांडेंनी निशाणा साधला. सर्वसामान्यांना सोमवार (दि. 1)पासून लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली, मात्र वेळेचे बंधन असल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार नाही. यावरून देशपांडे यांनी ट्विट केले आहे की, खूशखबर! कोरोनाबरोबर राज्य सरकारचा ऐतिहासिक करार. ठरावीक वेळेतच लोकलमधून फिरण्याचे कोरोनाचे आश्वासन जगभरातील डॉक्टरांना जमले नाही ते कंपाऊंडरने करून दाखवले. अभिनंदन! हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.
आजपासून चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने होणार सुरू
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील चित्रपटगृहे मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेंतर्गत ठरावीक प्रेक्षकांच्या संख्येसह चित्रपटगृहे सुरू करण्यात आली, परंतु आता 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या संदर्भात मार्गदर्शक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर केली असून, 100 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांच्या आत आणि कॉमन एरियामध्ये प्रेक्षकांना सहा फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे, तसेच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणार्या आणि प्रेक्षक बाहेर पडणार्या ठिकाणी सॅनिटायझर असणे बंधनकारक आहे. सरकारने घालून दिलेल्या अटी आणि निर्देशांनुसार चित्रपटगृहे सुरू करण्यात येणार आहेत.