Breaking News

कोल्हा‘पूर’; सर्वत्र पाणीच पाणी!

कोल्हापूर : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती मंगळवारी
(दि. 6) गंभीर बनली. पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केले असून, जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अशातच राधानगरी धरण पूर्ण भरल्याने आपत्कालीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
कोल्हापूरमध्ये मागील 12 दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील तलाव, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांत पाणी साचून नागरिकांची दाणादाण उडाली. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुराचा फटका पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीलाही बसला.

चिपळूण, खेड, राजापूरमधील पूरस्थिती कायम; महामार्ग ठप्प
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर मंगळवारीही (दि. 6) दिसून आला. जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती कायम राहिल्याने जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंदच होती.
खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असल्याने जगबुडी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. बाजारपेठेतही पुन्हा पाणी भरले. आपत्कालीन परिस्थिती पाहता खेडमधील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती.
चिपळूणला सलग तिसर्‍या दिवशीही पुराच्या पाण्याचा वेढा होता. वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात पाणी शिरले होते.
राजापूर शहरातही पुराचे पाणी शिरले होते, तर लांजा तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
सिंधुदुर्गातही पावसाचा जोर कायम आहे. सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीजवाहिन्या तुटल्याने बत्ती गुल झाली आहे.

सांगलीही पाण्याखाली; नागरिकांचे स्थलांतर
सांगली : मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, सांगली जिल्ह्यातील जवळपास 80 गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) टीम सांगलीत दाखल झाली असून, बचावकार्य सुरू केले आहे. पुरामुळे तब्बल 18 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
कृष्णा नदीला आलेल्या पुराने सांगलीतील अनेक भागांत पाणी घुसले. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. येथील पूरस्थिती पाहता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

कराड शहराला पुराचा वेढा
कराड : दोन दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयना या नद्यांना पूर आल्याने मंगळवारी (दि. 6) कराड शहराला पुराचा विळखा पडला. 140 पूरग्रस्त कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू होते.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर दिसून आला. कराडमध्येही तुफान पाऊस सुरू होता. त्यामुळे कराड, पाटण परिसरात अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून एनडीआरएफची टीम मागविण्यात आली होती.

सोशल मीडियाचा आधार
गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या अविश्रांत पावसाने ओढवलेल्या पुरात शहरातील बहुतांशी नागरी वस्त्यांत पाणी घुसल्याने आलेल्या आपत्तीकाळात सोशल मीडिया पूरग्रस्तांपर्यंत मदतीचा पूल जोडणारा आधार बनला आहे. पुराच्या पाण्यासोबत फोटो काढणे, पूर पर्यटनाचा आनंद घेणे एवढ्यापुरताच व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्रामचा वापर होत नसल्याचे सुजाण नागरिकांनी या वेळी दाखवून दिले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मदतीचे हात पुढे करणार्‍या असंख्य सामाजिक संस्था, स्वयंसेवक, प्रशासन, सर्वसामान्य नागरिकांनी सोशल मीडियाचा उपयोग करून शेकडो पूरग्रस्तांपर्यंत मदतीसह जेवण, पाणी, औषधे पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply