Breaking News

रायगडातील देवस्थानच्या जत्रा रद्द; जत्रोत्सवातील उलाढालीला कोरोनाची बाधा

अलिबाग : प्रतिनिधी

दिवाळी संपली की कोकणातील जत्रोत्सव सुरू होतात. रायगड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला असला तरी यंदा त्यावर कोरोनाचे सावट पहायला मिळत आहे. यामुळे अशा उत्सवातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. सप्टेंबरपर्यंत टाळेबंदीत लोकांचे आर्थिक गणित कोलमडले.गणेशोत्सवापासून हळूहळू टाळेबंदीला शिथिलता मिळाली आणि आतापर्यंत बर्‍यापैकी व्यवहार सुरू झाले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील सुरू झाली आहे, मात्र दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली. त्यामुळे कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर सण समारंभ साजरे करताना नियम आणि निकष शासनाने घालून दिले आहेत. मंदिराची दारे उघडली असली तरी नियमात राहूनच उत्सव साजरा करता येणार आहे. सध्याचे दिवस शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस असतात. भातांची मळणी काढून झालेली असते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात पैसे खुळखुळत असतात. अशात होणार्‍या यात्रोत्सवातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. त्यातून व्यावसायिकांना मोठा रोजगार उपलब्ध होतो, परंतु यंदा कोरोनामुळे जत्रोत्सवावर परिणाम झालेला दिसतो आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या शक्यतेने पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले असून, सारे वातावरण सुने सुने पहायला मिळत आहे. रायगडात सर्वांत आधी कार्तिक शुद्ध एकादशीपासून साजगाव येथील विठोबाच्या उत्सवानिमित्त पंधरा दिवसाचा जत्रोत्सव सुरू होतो. त्यानंतर अलिबाग तालुक्यातील आवासच्या नागेश्वराचा उत्सव, मापगाव येथील कनकेश्वराचा उत्सव, वरसोली येथील विठोबाचा उत्सव, डिसेंबरमध्ये चौल येथील दत्ताचा उत्सव असे उत्सव सुरू होतात आणि त्या निमित्ताने मोठी जत्रा भरते. या सर्व जत्रांमधून दोन महिन्यांत कोट्यवधींची उलाढाल होते. संबंधित ग्रामपंचायतींनाही कराच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते. स्थानिक तसेच परजिल्ह्यातून, परराज्यातून भाविक या उत्सवात सहभागी होतात, पण यंदा हे सर्व उत्सव साधेपणात साजरे होणार आहेत. साजगाव, नागेश्वर, कनकेश्वर, वरसोली येथील आगामी जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. उत्सवानिमित्त फक्त धार्मिक विधी होतील. भाविकांना मास्क घालून दर्शन घेता येईल, पण जत्रेच्या निमित्ताने दुकानदारांना मात्र आपली दुकाने थाटता येणार नाहीत. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून या जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जत्रांमधून होणारी कोट्यवधींची उलाढाल रायगडात यंदा होणार नाही हे नक्की!

नागेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागेश्वर देवस्थान आणि ग्रामपंचायतीने जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला, परंतु भाविकांची नागेश्वरावरील श्रद्धा पाहून उत्सव साधेपणाने साजरा करून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवले होते. या उत्सवाला शंभर वर्षांहून अधिक काळची परंपरा आहे. कोविड नियमांचे पालन करूनच भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply