Breaking News

पिकांना एमएसपी कायम राहणार; पंतप्रधान मोदींची ग्वाही; शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पिकांना एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 8) संसदेत बोलताना दिली. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी कोरोनापासून ते केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केले. सुधारित कृषी कायद्यांवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी त्यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, एमएसपी होता, आहे आणि भविष्यातही कायम राहील. गरिबांना परवडणार्‍या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाईल. मंडईचे आधुनिकीकरण केले जाईल. आपले कृषिमंत्री शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत बोलत आहेत. या सभागृहाच्या माध्यमातून मी पुन्हा त्यांना चर्चेसाठी निमंत्रित करतो, पण मुद्दा सोडवण्यासाठी त्यांनी पाऊल पुढे टाकले पाहिजेे. राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे नेते आणि प्रत्येक सरकारने कृषी सुधारणांच्या बाजूने भूमिका घेतली आहे, वकिली केली आहे. कुणीही मागे नाहीत. कारण प्रत्येकाला तसे वाटतेय. आता ते करू शकले नाहीत ही वेगळी गोष्ट आहे, पण या सुधारणा झाल्या पाहिजेत हे प्रत्येकाने म्हटले असल्याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी शीख समाजाचे कौतुक केले. शिखांनी जे योगदान दिले, त्याचा भारताला अभिमान आहे. शीख समाजाने देशासाठी भरपूर काही केले आहे. गुरू साहिब यांचे शब्द आणि आशीर्वाद आमच्यासाठी अनमोल आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली जाते, दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, त्याचा कोणालाही फायदा होणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. सध्या ठरवली जाणारी ध्येय आणि धोरणे ही पुढील अनेक दशकांमध्ये भारताची प्रगती सुनिश्चित करणारी आहेत. 2047 साली भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्ष साजरी करीत असेल तेव्हा देशाला नवीन उंचीवर नेऊ ठेवण्यासाठीची जी स्वप्ने आहेत त्याचा पाया आम्ही उभारत आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यावे. हे काम पूर्ण करण्यामध्ये आम्ही नक्कीच यश मिळवू असा माझा विश्वास आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आपले भाषण पूर्ण केले.

आंदोलनजीवींपासून सावध राहा

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशविरोधी विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शविणार्‍या आणि आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणार्‍या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी सडकून टीका केली. देशात नवी आंदोलनजीवी जमात उदयाला आली आहे. हे कधी पडद्यामागे, तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. जनतेने त्यांच्यापासून सावध राहावे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतीय लोकशाही मानवी संस्था

भारताची लोकशाही ही पाश्चिमात्य संस्था नाही, तर एक मानवी संस्था आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लोकशाहीवर शंका घेणार्‍यांना आणि परदेशी सेलिब्रिटींना फटकारले. भारतीय लोकशाहीवर जे लोक शंका घेतात किंवा भारताच्या या मूलभूत शक्तीवर ज्यांना शंका आहे त्यांना मी विशेष आग्रहाने सांगेन की, त्यांनी भारताची लोकशाही समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मूळ मुद्द्यावर विरोधक गप्प का?

सुधारित कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर होत असलेल्या विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी प्रत्युत्तर दिले. सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली. जास्तीत जास्त वेळ जे मुद्दे मांडले गेले, ते आंदोलनासंदर्भातील आहेत, पण कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे यावर मात्र सगळे गप्प आहेत. मूळ मुद्द्यावर चर्चा झाली असती तर चांगले झाले असते. कृषिमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत याची मला खात्री आहे, अशी टिप्पणी पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उद्देशून केली.

जे मनमोहन सिंग बोलले होते ते नरेंद्र मोदीला करावे लागतेय!

सध्या दिल्लीसह देशभरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असणार्‍या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होत असणार्‍या टीकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात समाचार घेतला. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. कृषी कायद्यांसंदर्भातील भूमिका काँग्रेसने बदलली असून, त्यांनी यू-टर्न घेतला आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांचे एक जुने वक्तव्य वाचून दाखवले. यामध्ये सिंग यांनी शेतकर्‍यांना त्यांचा माल विकण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले होते. शेतकर्‍यांना हा अधिकार मिळायला हवा तसेच कृषी बाजारपेठा अधिक खुल्या करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. कृषी बाजारपेठांना परावलंबी बनवणारी व्यवस्था बदलण्याचा आमचा उद्देश आहे, असेही त्यांनी म्हटले होते, असा दाखला पंतप्रधान मोदींनी दिला. 1930पासून असणार्‍या कृषी मालविक्रीसंदर्भातील यंत्रणा नव्याने उभारण्याची गरज असल्याचे सिंग यांनी म्हटल्याचे सांगून काँग्रेस माझे ऐकणार नाही. किमान सिंग यांचे तरी ऐकेल, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी चिमटा काढला. ‘आम्ही कृषी क्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अहो! उलट तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की, जे मनमोहन सिंग बोलले होते ते मोदीला करावे लागत आहे असे तुम्ही म्हटले पाहिजे,’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला सुनावले. भाजप खासदारांनी टेबल वाजवून पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचे समर्थन केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply