Breaking News

नोकरीच्या नावाखाली तरूणांची होतेय फसवणूक

पनवेलमधील एकाला नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून हजारोंचा गंडा

पनवेल : वार्ताहर

कोरोनामुळे बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे आता अनलॉकनंतर नोकरी शोधण्यासाठी अनेकजण विविध वेबसाइटवर आपला बायोडेटा अपलोड करतात. परिणामी, फसवणूक करणार्‍या व्यक्तीला याचा फायदा होतो. असाच प्रकार पनवेल परिसरात घडला आहे. नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अज्ञात टोळीने सुमारे 57 हजारांची रक्कम उकळून त्याची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या टोळी विरोधात फसवणूकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव स्वप्नील बर्वे (वय 22) असे असून तो पनवेलच्या डेरवली भागात कुटुंबासह रहाण्यास आहे. गत मे महिन्यामध्ये स्वप्नीलने बीटेकची परीक्षा दिल्यानंतर तो क्वालीटी ऑफीसर या नोकरीचा शोध घेण्यासाठी त्याने नोकरी डॉट कॉम या वेबसाइटवर आपली वैयक्तिक माहिती भरली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच मनिषा नावाच्या महिलेने नोकरी डॉट कॉममधून बोलत असल्याचे सांगून स्वप्नीलच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. त्यानंतर या महिलेने अमुल मिल्क लिमिटेड कंपनीमध्ये क्वालीटी ऑफिसरची व्हॅकेन्सी असल्याचे सांगून त्यासाठी स्वप्नीलला 1550 रुपये रजिस्ट्रेशन फि भरण्यास सांगितले. त्यानुसार स्वप्नीलने रजिस्ट्रेशन फिची रक्कम गुगल पेद्वारे पाठवून दिल्यानंतर अग्निहोत्री नामक व्यक्तीने अमुल मिल्क लि.कंपनीकडून फोनवरुन इंटरव्ह्यू घेत असल्याचे भासविले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मनिषाने त्याला फोन करून त्याची नियुक्ती झाल्याचे सांगून त्याच्या मेडिकल सेक्युरीटीसाठी 8500 रुपये, तसेच कंपनीसोबत बॉन्ड करण्यासाठी 12,500 रुपये स्वप्नीलला भरण्यास सांगितले. त्यामुळे स्वप्नीलने आपल्याला नोकरी नको, सर्व व्यवहार रद्द करण्यास तिला सांगितल्यानंतर मनिषाने हा व्यवहार रद्द करण्यासाठी 4190 रुपये भरल्यानंतर त्याची संपुर्ण रक्कम त्याला परत मिळेल असे सांगितले. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वप्नीलने ही रक्कम तिच्या खात्यावर पाठविल्यानंतर मनिषाने नेटवर्कच्या अडचणीमुळे रक्कम मिळाले नसल्याचे सांगून त्याला 5589 इतकी रक्कम दुसर्‍याा खात्यावर पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतरदेखील मनिषाने जीएसटी आणि सर्व्हीस टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगुन त्याच्याकडून एकुण 56 हजार 978 रुपये उकळले. 

त्यानंतरदेखील स्वप्नीलने आणखी 23 हजार रुपयांची रक्कम भरल्यास त्याला कंपनीकडून एक लाख रुपयांचा चेक दिला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे स्वप्नीलच्या लक्षात आल्यानंतर त्यांने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या गुह्यातील आरोपींविरोधात फसवणुकिसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून वेळोवेळी आवाहन

तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. यात बर्‍याचदा बँक अकाऊंटचे डिटेल्स किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे डिटेल्स मागितले जातात. डिटेल्स मिळताच फसवणूक करणारे लोक अकाऊंट साफ करून टाकतात. यामध्ये थोडीशी सावधगिरी बाळगली तर या फसवणूक करणार्‍या व्यक्तींपासून स्वत:चा बचाव करू शकतो. आपली बँक डिटेल, कोणताही आलेला ओटीपी, अथवा कोणत्याही प्रलोबनांना बळी पडू नका, असे आवाहन पोलीस वेळोवेळी करीत असतात.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply