Breaking News

इमूपालन व्यवसाय काळाच्या ओघात बाद?

पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुकचे स्व. बंधुजीराव पालांडे यांचे नातू प्रसन्ना पालांडे यांना व्यवसायाच्या वेगळ्या वाटा चोखाळण्याची इच्छा सातत्याने असल्याने त्यांनी आपल्या आजोळी गोळेगणी या गावात इमूपालन केंद्र सुरू केले. इमू पक्ष्यांनी अंडी देण्यास सुरुवात केली. या व्यवसायाने धन वाढविण्यास प्रारंभ झाल्याने अनेकांमध्ये या व्यवसायाबद्दल आकर्षण निर्माण झाले. जिल्हा उद्योग केंद्र आणि मिटकॉन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे इमूपालन प्रशिक्षण दिले गेल्याने या व्यवसायाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन नवोदित उद्योजकांना मिळू लागले होते, पण अचानक या

इमूपालन व्यवसायावर मंदीचे संकट आले आणि हा व्यवसाय काळाच्या ओघात बाद झाला.

पोलादपूर तालुक्यातील उद्योजक प्रसन्ना पालांडे यांनी 15 हजार रुपयांना एक जोडी अशा इमूंच्या 18 जोड्या घेऊन या खर्चिक उपक्रमाची सुरुवात केली. येथील हवामान, भौगोलिक परिस्थितीमुळे यापैकी तीन इमू दगावले. त्यानंतर मात्र औषधोपचार, देखभाल, अन्नपाणी, थंडी-पाऊस-ऊन-वारा यांपासून संरक्षण, लसीकरण अशा अनेक पातळ्यांवर प्रसन्ना पालांडे यांनी इमूंचे संगोपन काळजीपूर्वक सुरू केले होते, पण सरकारदरबारातील अनास्था आणि बँकांच्या उदासीन धोरणामुळे हा व्यवसाय पूर्णपणे बंद करावा लागला.

ऑस्ट्रेलियातील मूळचा इमू पक्षी ज्या रेटीट कुळातील आहे, त्यामध्ये शहामृग, रेहा, किवी, कॅसोवरी अशा अन्य पक्ष्यांचाही समावेश आहे. पंख लहान आणि शरीर मोठे असल्याने हे पक्षी उडू शकत नाहीत. साधारणत: सहा महिन्यांपर्यंतच्या पिलांमध्ये नर-मादी अशी चिन्हे दिसू लागतात. मूलत: कोणत्याही हवामानाला आणि भौगोलिक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असलेले इमू पक्षी फारच आक्रमक असतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर इमूची उंची पाच ते सहा फूट, तर वजन 40 ते 60 किलोपर्यंत वाढू शकते. इमूंचे मांस 350 ते 400 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते. कोकणातील हवामान ऑस्ट्रेलियाप्रमाणेच इमूंच्या वाढीस पोषक आहे. त्यामुळे 18 महिन्यांच्या वयात मादी प्रजोत्पादन करू शकते. गुद्द्वार हाच इमूंचा विष्ठामार्जन, अंडी देण्याचा तसेच समागमाचा मार्ग असल्याने स्वच्छता अधिक महत्त्वाची बाब असल्याचे लक्षात घेऊन पालांडे यांनी इमूपालन केंद्रावर अनुभवी व्यक्ती नेमली. याखेरीज स्टार्अर फिड, गोअर फिड, लेअर फिड, मेन्टेनन्स फिड, पालेभाजी असे खाद्य तसेच पुरेसे पाणी यांचा पुरवठा सुरू केला. इमू पक्षी दिवसाला 800 गॅ्रम खाद्य आणि तीन ते पाच लिटर पाणी घेत असल्याने त्याकडेही त्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. प्रजोत्पादनाचा काळ जवळ आल्याने ही बाब आवश्यक आहे.

इमूंचे आयुर्मान साधारणत: 35 ते 40 वर्षांपर्यंत असून, 18 महिन्यांपासून प्रजोत्पादनास सज्ज झालेली प्रत्येक इमू मादी ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांच्या प्रजनन काळात 30 ते 35 अंडी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत देऊ शकते. ही अंडी उबविण्यासाठी योग्य किंवा अयोग्य अशा दोन प्रकारची असतात. या अंड्याला नगास 1000 ते 1200 रुपयांचा भाव मिळतो, पण तरीही पिकते तिथे विकत नाही या न्यायाने या अंड्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच अन्य प्रयत्न होण्याची गरज आहे, मात्र यंत्रणांना याबाबत स्वारस्य नसल्याने इमूपालन करायचे की बाजारपेठ शोधायची या प्रयत्नात दोन्हीकडे हेळसांड होऊन या व्यवसायाचा र्‍हास झाला.

इमूंना मोकळेपणाने फिरता यावे यासाठी पाच गुंठे जमिनीवर 10 नर-मादी जोड्या असे क्षेत्र असावे लागते. पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यापासून तीन ते पाच लिटर तेल मिळते. त्याचा बाजारभाव तीन ते पाच हजार रुपये प्रतिलिटर आहे. इमूचे कातडे नरम व मऊशार असल्याने चर्मोद्योगामध्ये या कातड्याला खूपच मागणी आहे. इमूच्या पिसांपासून लोकर तयार करता येत असल्याने विविधाकर्षक पेहराव आणि टोप्यांमध्ये या लोकरीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. एका इमू पक्ष्याच्या विष्ठेपासून दररोज किमान 500 ग्रॅम सेंद्रीय खत उपलब्ध होते.

इमू पक्षी सहसा कोणत्याही दुर्धर आजाराला बळी पडत नाहीत किंवा त्यांना अशा आजारांची लागणही फारशी होत नाही. जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता, राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जपुरवठा, विमा संरक्षण अशा सुविधांमुळे हा व्यवसाय सुरू करण्यास विशेष धोका नसूनही ज्याप्रमाणे ’संडे हो या मंडे, रोज खावो अंडे’ या स्लोगन आधीची ओळ ’मुर्गी के अंडे’ असा प्रघात रूढ झाल्याने इमूची अंडी बाजारपेठ मिळण्यापासून वंचित राहिली. अलीकडे बाजारपेठेमध्ये कृत्रिम प्लास्टिकची अथवा रासायनिक अंडी विक्री होऊ लागली आहेत. याचाच अर्थ सध्याच्या लोकसंख्येसाठी कोंबड्यांच्या अंड्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे कोंबडीच्या अंड्यांना इमूची अंडी हा सक्षम पर्याय होऊ शकणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील कृषी क्रांती केंद्रामार्फत पक्षी पुरवठ्यासह अंडी खरेदीही केली जात असते. त्यामुळे व्यवसायाला बाजारपेठ शोधण्याची जबाबदारी राहत नव्हती, मात्र कालांतराने याकडेही दुर्लक्ष होऊ लागले.

एका आठवड्याच्या इमूपालन प्रशिक्षण कार्यक्रमात इमूची ओळख, पालन, व्यवसाय, या व्यवसायाची आंतरराष्ट्रीय व महाराष्ट्रातील सद्यस्थिती, भविष्यातील संधी, प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी, फार्मचे व्यवस्थापन, इमूचे जीवनचक्र, संतुलित आहार, आजार आणि उपचार, महाइमू असोसिएशनचे विविध उपक्रम, विक्रीतंत्र तसेच इमूपालन केंद्राला प्रत्यक्ष भेट यांचा समावेश असून याखेरीज व्यक्तिमत्त्व विकास, विक्री कौशल्य, बाजारपेठ तसेच शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली जाते, मात्र मिटकॉन आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या व्यवसायाचा पुरेसा प्रसार न झाल्यानेच सद्यस्थितीतील कोंबडीच्या अंड्यांची आणि मांसाची कमतरता इमूपालनातून मिळणार्‍या अंडी व मांसामुळे दूर होऊ शकेल अशी परिस्थिती राहिली नाही.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply