Breaking News

मिनीट्रेनच्या खासगीकरणामुळे पर्यटन क्रांती

माथेरानकरांना विश्वास

माथेरान ः रामप्रहर वृत्त

माथेरान मिनीट्रेनच्या सेवेबाबत पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी पर्यटकांना या सेवेचा मनमुरादपणे लाभ घेता येत नाही. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने माथेरान मिनीट्रेनच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना अधिक सुखसोयी मिळून स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. या निर्णयाचे माथेरान नगर परिषद प्रशासन, पर्यटक तसेच स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

माथेरानकरांसह पर्यटकांचीही ही ट्रेन जीवनवाहिनी बनली आहे. या ट्रेनच्या सफरीसाठी देशविदेशातील पर्यटक भेट देतात, परंतु नेरळ-माथेरान सेवा बंद असल्याने सर्वांचा हिरमोड होत आहे. अमन लॉज ते माथेरानदरम्यान या ट्रेनची शटल सेवा उपलब्ध असल्यामुळे माथेरानच्या पर्यटनात वाढ झाली आहे, अन्यथा एक भकास पर्यटनस्थळ म्हणून याची ओळख निर्माण झाली असती. स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे निदान शटल सेवा तरी सुरू आहे. त्यामुळेच येथील स्थानिकांसह तालुक्यातील जवळपास 25 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. नेरळ, कर्जत त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना केवळ माथेरानच्या पर्यटनावर अवलंबून राहावे लागत आहे.

नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा बंद असल्याने नाईलाजाने पर्यटकांना खासगी वाहनाने अव्वाच्या सव्वा रक्कम मोजून घाटरस्त्याचा सात किमीचा प्रवास करावा लागतो. नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा सुरू झाल्यास सर्वांनाच फायदेशीर ठरणार आहे. येथे येणारे पर्यटक खासकरून मिनीट्रेनच्या सफरीसाठी येत असतात. ऐन गर्दीच्या वेळी तिकीट उपलब्ध न झाल्यास खासगी वाहनानेही प्रवास करता येतो. त्यामुळे खासगी वाहनचालकांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

खासगीकरणामुळे पर्यटकांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल. देशातील चार पर्यटनस्थळी चालणार्‍या मिनीट्रेन तोट्यात आहेत. त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसून भविष्यात सरकार ह्या ट्रेन बंद करू शकते. आपले आर्थिक गणित पर्यटनावरच अवलंबून आहे. या पर्यटनाचा खरा कणा माथेरानची

मिनीट्रेन आहे. तीच बंद झाली तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे केंद्र शासनाने घेतलेला खासगीकरणाचा निर्णय योग्यच आहे, असा विश्वास माथेरान नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

   खासगीकरणामुळे आपली माथेरानची मिनीट्रेन अविरत सुरू राहून पर्यटकांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल. वाहतुकीचा प्रश्नही सोडवण्यास त्यामुळे मदत होईल. रेल्वेला माथेरानच्या ट्रेनमुळे दरवर्षी 80 कोटींचे नुकसान होते. यावर अंदाजे 100 कोटींचा खर्च होतो, तर पर्यटनाच्या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत 20 कोटी रुपये जमा होतात. एवढा तोटा सहन करूनही रेल्वे प्रशासन रेल्वेसेवा देत आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना अधिकाधिक सुखसुविधा तसेच स्थानिकांना चांगला रोजगार प्राप्त होईल, असे मतही नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply