पेण : प्रतिनिधी
हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणार्या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या 3000 एकर क्षेत्रातील भातपीक लागवडीच्या काम शेतकरी बांधवांनी पूर्ण क्षमतेने करून 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात तब्बल 1300 एकराहून अधिक क्षेत्रावर भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या 1700 एकर क्षेत्रात भर पडून उन्हाळी हंगामातील भात लागवडीच्या क्षेत्राने एकुण 3000 एकराचा टप्पा गाठला आहे.
रब्बीच्या हंगामात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने भाताला प्रति क्विंटलला दिलेला 1880 रुपये हमीभाव व 700 रुपये प्रति क्विंटलला बोनस मिळून 2580 रुपये मिळणारी आधारभूत किंमत, याशिवाय भाताचा पेंढयांची एक गुंडी सहा ते आठ रुपयास गुरांच्या वैरणीसाठी दुग्धव्यवसायीक खरेदी करत असल्याने या पेंढयातून एकरी खर्च केलेला उत्पादन खर्च नीघत असल्याने उन्हाळ्यात भातशेती लागवड शेतकर्यांना फायदेशीर ठरते. याशिवाय गत वर्षात कोरोना महामारी संसर्गाच्या उपद्रवामुळे बहुतेक शेतकरी शेतीकडे वळले. नफा असो या तोटा शेती पिकवायचीच हा श्रम साफल्याचा मंत्र अनुसरुन शिवारात मोठी गर्दी पहावयास मिळाली होती. शेतकर्यांनीच कोरोना महामारीत देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली हे या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत अर्थ संकल्प सादर करताना केलेले विधान बोलके ठरले आहे. या श्रम संस्कृतीला अनुसरून सध्या पेण पूर्वेकडील हेटवणे सिंचनाचे पाण्यावर आधारित कालव्यातून सोडलेल्या 19 किलोमीटर परिसरातील सापोली, आधरणे, कुरमुर्ली, शेणे, कामार्ली, हेटवणे क्वालनी परिसर, बोरगाव, शहापाडा धरणातील परिसरातीलरोडे काश्मीरे या टप्प्यात भातशेती लागवडीचे क्षेत्रात भातशेती लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. शेती उत्पादना सोबतीने भाजीपाला शेती, झेंडू, मोगरा, रताळी, हळद, कंदमुळे, वाल, पावटा, भुईमूग इत्यादी प्रकारची उत्पादने सध्या उन्हाळी हंगामात शेतकरी घेत आहेत. मुबलक पाणी, भरपूर प्रमाणात सुर्यप्रकाश, रात्रीचा गारवा, खते व किटकनाशकांची मात्रा यामुळे नैसर्गिक अशा पिकांचे वाढीसाठी उपयुक्त वातावरण निर्मिती होत असल्याने पिकांची जोमदारपणे वाढत आहेत. केलेला खर्च व नफा यांचा योग्य ताळमेळ जुळत असल्याने येथील शेतकरी बांधवांनी वर्षासाठी दोन वेळा उत्पादन घेतले आहे.
यावर्षी शेतात जे पिकलं त्याने कुटुंबातील सदस्यांच्या उदरनिर्वाहाची उत्तम प्रकारे व्यवस्था झाली आहे. येणार्या उत्पन्नाची जोड खरीप हंगामासाठी होईल आणि सर्व काही ठिकठाक होईल. सध्या कोरोना महामारी संसर्गाच्या उपद्रवामुळे पून्हा एकदा टाळेबंदी लागू केली जाणार आहे असे न्यूज वाहिन्यांवर पहावयास मिळते आहे. आम्हा शेतकर्यांना शिवार मोकळ आहे. पक्षांचा किळकिलाट, किटकांच्या भिरभिरणे, शेतातील थंडगार पाणी, शुध्द हवेचा झोत व डोक्यावर पडणार उन त्यामुळे शेतावर काम करताना व एरवी फेरफटका मारताना दिवस आनंदात जातो. ना गर्दी, नाही धावपळ, सगळं काही ठिकठाक त्यामुळे आमचं गाव आमचं शिवार ही परिक्रमा कृषी क्षेत्रातील आहे. शेतीच्या प्रत्येक बाबीवर लक्ष केंद्रित करून सायंकाळी घराकडे परतायचे कुटुंबातील सदस्यांसोबत स्वस्थ राहतोय आणि सुखी समाधानी रहातो ही शेतकरी बांधवांची सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करीत दिलेली प्रतिक्रिया बोलकी तितकीच समाधान देणारी आहे. विशेष म्हणजे आज हेटवणे सिंचनाची पूर्ण वितरण व्यवस्था झाली असती तर पेणची पश्चिम बाजूकडील शेती देखील उन्हाळ्यात लागवडीखाली आली असती हेटवणे धरण सिंचनाचे क्षेत्रामध्ये ओलिता खालील 52 गावांच्या 6 हजार 668 हेक्टर शेतजमीनीचा समावेश केला आहे. गेली 20 वर्षे उलटून देखील उर्वरित कालव्याच्या कामेरखडलेली बंद आहेत. सध्य स्थितीत हेटवणे धरणात सिंचनासाठी 80.275 दशलक्ष घनमीटर पाणी धरणात आरक्षणाचे पडून आहे.यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेणे गरजेचे तेवढेच आवश्यक सुध्दा आहे. धरणाचा एकूण जलसाठा 1147.49 दशलक्ष घनमीटर आहे. मृत जलसाठा 2.52 दशलक्ष घनमीटर, उपयुक्त जलसाठा 144.98 दशलक्ष घनमीटर असून, निव्वळ जलसाठा 137.652 दशलक्ष घनमीटरआहे.