Breaking News

आदिवासीवाड्यांना जोडणार्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासीबहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्या-पाड्यांना जोडणार्‍या या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने या भागातील आदिवासींना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. परिणामी नादुरुस्त रस्त्यामुळे लोकांचे हाल होत असून दळणवळणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या उपजीविकेवरही विपरीत परिणाम होत आहे.

आदिवासी बांधव उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त भाजीपाला लागवड, पावसाळ्यात उगवणार्‍या रानभाज्या जमा करून शहरातील बाजारात विक्रीसाठी नेतात, मात्र खराब रस्त्यामुळे कोणतेही वाहन वस्तीवर येत नसल्याने डोक्यावर ओझे घेऊनच बाजार गाठावा लागतो. आजारी व्यक्तीस दवाखान्यात दाखल करण्यासाठी चादरीची डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने मोलमजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. 20 वर्षांपासून आदिवासी भागातील अनेक रस्त्यांची कामे झाली नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हर्‍याची वाडी, नवसूची वाडी यांना जोडणार्‍या रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. तीव्र चढउताराच्या या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यात काही महिन्यांपूर्वी वारे ग्रामपंचायतीने वारे जांभूळवाडी रस्त्यावर मातीचा मुलामा चढवून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तो उपायही कुचकामी ठरत आहे. रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसत असून त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वारे जांभूळवाडी रस्ता चांगल्या दर्जाचा तयार करावा, अशी मागणी येथील आदिवासी बांधव करीत आहेत.

20 वर्षे झाले तरी आमच्या वाडीचे रस्ते झाले नाहीत. खराब रस्त्यामुळे गाड्या येत नाहीत. सरकारचे आमच्या आदिवासी भागाकडे लक्ष नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठीही अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते.

-महेंद्र  कैवारी, ग्रामस्थ 

आमच्या वाडीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नसल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करण्यास त्रास होतो. गाड्यांचाही खुळखुळा झाला आहे.

-प्रकाश शिंगवा, ग्रामस्थ

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply