Breaking News

‘पनवेल टाइम्स’च्या विशेषाकांचे प्रकाशन

लोकांपर्यंत पोहोचलेले वृत्तपत्र : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल टाइम्स हे लोकांपर्यंत पोहोचलेले वृत्तपत्र असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या वृत्तपत्राने करून सामाजिक विचार आणि बांधिलकी जपण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 21) येथे केले. ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संपादित साप्ताहिक पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन आमदार ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ कार्यकर्ते सी. सी. भगत, पत्रकार कुणाल लोंढे, प्रशांत शेडगे, संजय कदम, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे तसेच भालचंद्र जुमलेदार, लक्ष्मण ठाकूर, सुमंत नलावडे, अविनाश जगधने, शैलेश जोशी आदी उपस्थित होते.
पनवेलसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेने पनवेल टाइम्स हे वृत्तपत्र काम करीत आहे. या वृत्तपत्राने पनवेलची जडणघडण पाहिली असून, लोकांची मने जिंकण्याचा पायंडा असाच कायम राहिल असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पनवेलकरांच्या जीवाभावाचे तसेच शहरी व ग्रामीण भागात कानाकोपर्‍यात वाचकांना वेगवेगळ्या बातम्या, समस्या पोहोचविणारे हे वृत्तपत्र आहे. या वेळी आमदार ठाकूर यांनी गणेश कोळी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी प्रास्ताविकात, पनवेल शहरातील सुरुवातीचे साप्ताहिक असलेल्या या वृत्तपत्राने पत्रकारिता धर्म पाळत काम केले. पनवेलची सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक ओळख गेली अनेक वर्षे पनवेल टाइम्सच्या माध्यमातून मांडली जात आहे. पनवेलच्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेले हे वृत्तपत्र यापुढेही सामाजिक भान राखून कार्यरत राहील, असे सांगितले.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply