Breaking News

पोलादपूरच्या विकासातील अडथळे दूर करण्याची गरज

रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखला जाणारा पोलादपूर तालुका हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखला जात आहे. येथील भौगोलीक परिस्थिती, हवामान आणि जनजीवनामध्ये विविधता दिसून येते. ऐतिहासिक पार्श्वभूमी उज्ज्वल आणि वर्तमान खडतर असलेल्या या तालुक्याचे भवितव्य कसे असेल, याचे आत्ताच भाकित करणे धाडसाचे आहे.

महाड तालुक्याचा भाग असलेला पोलादपूर महाल आता स्वतंत्र तालुका होऊन सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करीत असला तरी तो तालुका कधी झाला याची सरकार दप्तरी तसेच अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नकाशामध्येही दिसून येत नाही.

पोलादपूरचा वर्तमानकाळ खडतर आहे. पिण्याचे पाणी जेथे मैलोन्मैल फिरून मिळवावे लागते, नोकरीसाठी मुंबई, पुणे आणि सुरत, बडोदा अशी शहरे पोलादपूरकर चाकरमान्यांनी आपलीशी केल्याने आता पुढील पिढीसाठी रोजगार निर्मिती कशी करावी, याबाबतची उदासिनता दिसून येत आहे. तालुक्यातील सहकाराचा स्वाहाकार करून आता सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील पतसंस्थांना मोठ्या प्रमाणात सहकार्य होऊ लागले आहे. पोलादपूर तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा अधिकारी वर्ग केवळ नोकरीनिमित्त पगार मिळविण्याच्या हेतूने कार्यरत असून, तालुक्यातील ग्रामीण दूर्गम भागातील जनतेच्या पैशांचे रक्षण होत नाही, हे या अधिकार्‍यांचे अपयश आहे. शेळी मेंढ्या पालन, दुधदुभती जनावरे यांच्या विपुलतेकडे दूर्लक्ष सुरू झाल्याने तालुक्यात परजिल्ह्यातील दररोज 3000 लिटर्स दूध आयात करण्यापर्यंत तसेच कसायाला जनावरे देण्यापर्यंत दृष्टीहिन झाला आहे. वडिलोपार्जित जमीनीचे गैरव्यवहार थोड्या धनाच्या अभिलाषेने करून शेतकर्‍याला परांगदा करण्याची व्यावसायिकता आणि सिंचनाखाली आणण्याची स्वप्नं दाखवून कोरडी धरणं बांधण्याच्या सरकारी मानसिकतेची क्रूरता येथे पाहण्यास मिळते. तंटामुक्त गाव मोहीम आणि निर्मलग्राम अशा सरकारी उपक्रमांमधून तालुक्याने नाव लौकिक आणि सरकारी इनामांची रक्कम प्राप्त केली असली तरी त्या रकमांच्या विनियोगातून आदर्शवत काही केल्याची नोंद येथे घेणे शक्य होत नाही. वरिष्ठ महाविद्यालये आणि आयटीआयसारख्या शिक्षण संस्था असूनही रोजगाराभिमुखता नसल्यामुळे तालुक्यात दरवर्षी बेकारांची निर्मिती मोठ्या संख्येने होत आहे. तालुक्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असली तरी इंडो जर्मन प्रोजेक्टमधील ट्रॉमा केअर हॉस्पिटल तालुक्याने गमावले आहे. पळचिल आरोग्य केंद्राची इमारत आणि भोगावचे उपकेंद्र पुर्णत: कार्यान्वित झाले नाही. पाणीपुरवठा योजनांची स्थिती बिकट आहे. 

तालुक्याचे गांव असलेल्या पोलादपूर शहराचे आता नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले असले तरी हाती घेतलेली पाणीपुरवठा योजना फिल्टरेशन प्लांटअभावी अपूर्णच आहे. अपार्टमेंटस् उभारताना ग्राहकांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांकडे दूर्लक्ष होताना तालुक्याचे नुकसान कोण लक्षात घेत नाही. एसटी महामंडळाबाबतच्या तक्रारींची दखल घेतली नाही. भेसळ आणि अन्नपुरवठ्यातील काळाबाजार नियंत्रणात आणणारी यंत्रणा सक्षम नाही. पोलादपूरची गोड्या पाण्यातील मासळी संवर्धन करण्यासाठी नद्यांमध्ये बुजलेले पाण्याचे डोह पुन्हा खोल करण्याची गरज आहे. चौपदरीकरणकामी भरावासाठी या डोहांतून काही पात्रातील दगड गोटे उपसण्यात आल्याने यंदा पूरस्थिती नियंत्रणात आली असली तरी  गौणखनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दृश्य चिंताजनक आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याने पोलादपूर तालुका दळणवळणाचा महत्वाचा केंद्रबिंदू ठरू शकेल. पोलादपूरकरांना पर्यटक आणि प्रवासीवर्गाची सुविधा करण्याची जबाबदारी पुष्कळशी रोजगारसंधी व्यापारवृध्दी करणारी ठरणार आहे.तालुक्याचे वर्षापर्यटन विलोभनीय असल्याने पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करून ग्रामसंस्कृतीची खरी ओळख करून देणारी मानसिकता येथील ग्रामीण भागात वाढविण्याची गरज आहे. येथील तांत्रिक व उच्च शिक्षण घेतलेल्या तरूणांना रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी गमावलेल्या पंचतारांकित एमआयडीसीला पर्याय म्हणून अन्य औद्योगिक कारखान्यांना निमंत्रित करण्याची गरज आहे. ‘विना सहकार नही उध्दार‘ या संकल्पनेसोबत तालुक्याचा विकास राजकारणविरहित करण्यासाठी सध्या राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सरकारी अधिकार्‍यांवर योग्य नियंत्रण ठेवणारे सक्षम नेतृत्व तालुक्यात आहे अथवा कसे हे पाहून त्या नेतृत्वाला संधी देण्याची क्षमता आता समाजमनात फोफावली पाहिजे.

पोलादपूरचा विकास ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. त्यासोबतच जे नैतिकता पालन करीत नाहीत, त्यांना विकासप्रक्रियेतील अडथळा समजून बाजूला करण्याची गरज आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply