पोलिसांचा लाठीचार्ज
पोलादपूर : प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या आदेशांचा विपर्यास प्रशासनाकडून केला गेला आणि पोलादपूर शहरात काय बंद आणि काय सुरू ठेवायचे याबाबत प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांकडून बुधवारी (दि. 7) संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा प्रकार झाला. त्यामुळे व्यापारीवर्ग रस्त्यावर उतरला. काही पोलिसांनी लाठीचार्ज करुन व्यावसायिकांना पांगविले.
पोलादपूर शहरात गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी बुधवारी संपुर्ण बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापारी आक्रमक झाले. ते रस्त्यावर उतरले.पोलिसांनी काही दुकानदार तसेच काही दुकानातील काचेच्या फर्निचरवर लाठीचार्ज केल्याने संतापाची भावना वाढीस लागली. दरम्यान, शहरातील व्यापारी व व्यावसायिकांनी तहसिलदार दिप्ती देसाई, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे यांना निवेदन दिले. या वेळी मुख्याधिकारी लबडे यांनी, कोणती दुकाने सुरू अथवा बंद राहतील, याबाबत माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिले.