कोलंबो : वृत्तसंस्था
कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 38 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 165 धावांचं आव्हान ठेवले होते, मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.3 षटकात गुंडाळला. श्रीलंकेचा संघ केवळ 126 धावा करू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारने निर्णायक खेळी केली. सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक ठोकले, तर भुवनेश्वरने महत्त्वाचे चार बळी घेतले. आजच्या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.श्रीलंकेची सुरुवातच खराब झाली. श्रीलंकेकडून असालांकाने सर्वाधिक 44 धावा केल्या. अविष्का फर्नांडोने 26 धावा, दसुन शनाकाने 16 धावा आणि मीनोद भानुकाने 10 धावा केल्या. श्रीलंकेच्या इतर खेळाडूंना धावांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 बळी घेतले. दीपक चहरने दोन आणि क्रुणार पांड्या, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक-एक बळी घेतले. त्याआधी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातही खराब झाली. टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या संजू सॅमसनने शिखर धवनसोबत 51 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसननंतर सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. दोघांनी मिळून 52 धावांची भागिदारी केली, मात्र 14व्या षटकात शिखर धवन 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर 15व्या षटकांत सूर्यकुमार यादवही 50 धावांवर बाद झाला. नंतर आलेल्या हार्दिक पांड्याने 10, इशान किशनने 20 आणि कृणाल पांड्याने 3 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून हसरंगा आणि चमीरा यांनी प्रत्येकी दोन बळी, तर करुणारत्नेने एक बळी घेतला.