Breaking News

वरसोली समुद्रकिनार्यावर स्वच्छता अभियान

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रिझम सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम

अलिबाग : जिमाका

रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था व स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनार्‍यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी या वेळी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वरसोली समुद्रकिनार्‍यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या वेळी रवींद्र नाईक उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे. त्याचा आपण वापर करताना निसर्गाचे नुकसान होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनीही मनोगत व्यक्त केले. भारतीय सैन्याचे जवान मयूरेश गावंड, निसर्गप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्त्या बेला दलाल, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, क्रीडा अधिकारी सचिन निकम, कुस्ती कोच संदीप वांजळे, सिमाली रवींद्र नाईक, बार्टीच्या समतादूत अनुजा पाटील यांच्यासह वरसोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी, स्पर्धा विश्व अकॅडमी आणि प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते आणि सुमारे 100 विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply