विजय हजारे क्रिकेट स्पर्धा
जयपूर : वृत्तसंस्था
मुंबई संघाने हिमाचल प्रदेशचा 200 धावांनी दणदणीत पराभव करीत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली, तसेच ‘ड’ गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 321 धावांचा डोंगर उभारला होता. यशस्वी जैस्वाल (2), पृथ्वी शॉ (2) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (2) हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यामुळे मुंबईची अवस्था 3 बाद 8 धावा अशी बिकट झाली होती. त्यानंतर सर्फराझ खानही (11) मैदानावर फार काळ तग धरू शकला नाही.
सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे या माजी कर्णधारांनी पाचव्या गड्यासाठी 99 धावांची भागीदारी रचत मुंबईला संकटातून बाहेर काढले. सूर्यकुमारने हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत 75 चेंडूंत 15 चौकारांसह 91 धावांची खेळी केली. सूर्यकुमार 31व्या षटकांत बाद झाल्यानंतर तरे आणि शार्दूल ठाकूर यांनी सहाव्या गड्यासाठी 112 दावा जोडल्या. शार्दूलने तडाखेबंद फलंदाजी करताना 57 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांनिशी 92 धावा फटकावल्या. तरेने 83 धावा करीत मुंबईला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. हिमाचलकडून रिषी धवनने चार, तर जसवालने तीन बळी मिळवले.
मुंबईचे हे आव्हान पेलताना हिमाचल प्रदेशच्या फलंदाजांनी धवल कुलकर्णी, प्रशांत सोलंकी आणि शाम्स मुलानी यांच्या प्रभावी मार्यासमोर नांगी टाकली. तळाच्या मयांक डगरने नाबाद 38 धावांची सर्वाधिक खेळी केली. अखेर हिमाचल प्रदेशचा डाव 121 धावांवर संपुष्टात आणत मुंबईने 200 धावांनी विजय नोंदवला. मुंबईकडून सोलंकीने चार बळी मिळवले.
विजयानंतरही महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात
जयपूर : यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पुद्दुचेरीवर 137 धावांनी मात केली, मात्र या विजयानंतरही महाराष्ट्राला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने बाद फेरीत मजल मारण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.
प्रथम फलंदाजी करताना नाहर आणि बावणे यांनी दुसर्या गड्यासाठी 192 धावांची भागीदारी रचत दमदार सुरुवात केली. नाहरने 120 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह 119 धावांची खेळी साकारली. त्यानंतर बावणेने 115 चेंडूंत 10 चौकार आणि एक षटकारासह 110 धावा फटकावल्या. मधल्या फळीतील राहुल त्रिपाठीने नाबाद 59 धावांची खेळी केल्यामुळे महाराष्ट्राने 4 बाद 333 धावांचा डोंगर उभा केला.
हे आव्हान पार करताना मध्यमगती गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याच्या गोलंदाजीपुढे पुद्दुचेरीच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. 4 बाद 21 अशा अवस्थेतून त्यांना शेल्डन जॅक्सन (45) आणि आशिथ राजीव (30) यांनी तारले. सागर त्रिवेदीने एका बाजूने नाबाद 79 धावा करीत किल्ला लढवला, पण पुद्दुचेरीचा डाव 43.2 षटकांत 196 धावांवर संपुष्टात आला. महाराष्ट्राकडून राजवर्धनने चार, तर सत्यजीत बच्छाव व केदार जाधवने प्रत्येकी दोन बळी मिळवले.