अरुंद रस्ता, कमकुवत कठडे आणि कोसळणार्या दरडीमुळे प्रवासात भिती
माणगाव : सलीम शेख
रायगड जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राबरोबर जोडणारे महत्त्वाचे तीन तर तळकोकणात जाण्यासाठी एक घाटमार्ग आहे. या घाटमार्गातील रस्ते अरुंद, तीव्र चढ- उताराचे व धोकादायक नागमोडी वळणाचे असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच या रस्त्यांकडेला असणार्या खोल दर्या व दरडींमुळे हे घाटमार्ग मृत्यूचा मार्ग ठरत आहेत. या घाटमार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी, भोर, आंबेळी आणि कशेडी या महत्त्वाच्या घाटमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. 1198-99 मध्ये या रस्त्याचे काम करण्यात आले. पुणे – दिघी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आला होता. त्यावेळेस काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम डबर, सिमेंटमध्ये करण्यात आले होते. परंतु ते काम मजबूत झाले नसल्यामुळे या संरक्षक भिंती आता कमकुवत झाल्या आहेत. या रस्त्याच्या कडेला खोल दर्या आहेत. त्यातच हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे समोरून येणार्या वाहनचालकांना धोका जाणवत आहे. काही ठिकाणी संरक्षणासाठी पत्र्याचे कठडे उभारले आहेत. तर काही अवघड वळणांवर संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा घाटरस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य रस्ते विकास महामंडळाने धोकादायक वळणांच्या ठिकाणी मजबूत संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी प्रवाशी व पर्यटकातून होत आहे.
माणगाव-पुणे व माणगाव-दिघी रस्त्याचे काम झाले मात्र तेथेल दरडी हटवणे गरजेचे होते. त्याचबरोबर या घाटरस्त्याचे रुंदीकरण व संरक्षक कठडे म्हणावे तसे झालेले नाहीत. ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्याच्या अवघड वळणांवर संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे. तेथे वाहन चालकांना खोल दर्यांच्या धोका संभवतो. या मार्गावरील वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. रायगड किल्ला, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, माणगावसह दक्षिण रायगड, दापोली, मंडणगड या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून या घाटामध्ये संरक्षक भिंती नाहीत.
ताम्हिणी घाटातील निसर्गरम्य धबधबे तसेच भिरा येथील देवकुंड हे पर्यटक व ट्रेकर यांचे प्रमुख आकर्षण झाले आहे. त्यामुळ पर्यटक या घाटामध्ये थांबून निसर्गरम्य परिसराचे दर्शन घेऊनच पुढील प्रवास करतात. या घाटातील दर्या व डोंगर रस्त्याच्या कडेलाच आहेत. तेथे काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नसल्यामुळे पर्यटकांना व प्रवाशांना धोका जाणवू लागला आहे. त्यामुळे शासनाने ताम्हिणी घाटातील रस्त्यावर आवश्यकता असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंती उभाराव्यात व कमकुवत झालेले संरक्षक कठडे नव्याने बांधावेत अशी मागणी प्रवासी व पर्यटकातून होत आहे.