Tuesday , March 28 2023
Breaking News

धरणे, धबधब्यांवर जाताय तर जरा सावधान ; पोलिसांकडून सूचना फलक

पनवेल ः वार्ताहर

दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबईसह, ठाणे, कल्याण व उपनगरातून वर्षासहलीसाठी नागरिक पनवेल परिसरातील गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा, पांडवकडा आदी भागांमध्ये येत असतात. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेल्या गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा या ठिकाणी पर्यटनास मनाई असल्याचे फलक पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत.

अनेक वेळा या ठिकाणच्या पाण्याच्या परिस्थितीची, तसेच पडणारा मुसळधार पाऊस याचा पर्यटकांना अंदाज नसतो. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वर्षासहलीसाठी येणार्‍या नागरिकांचे नाहक जीव गेले आहेत, तसेच पाण्यात उतरून उड्या मारणे, पोहता येत नसतानाही खोल पाण्यात जाणे, मद्यपान करणे, महिला वर्गाची टिंगलटवाळी आदी प्रकार सुरू असल्याने या सर्व गोष्टी टाळण्यासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी मुख्य ठिकाणी सूचना फलक लावले आहेत.

धरणाच्या परिसरात दरवर्षी एखाद दुसर्‍याला आपला जीव गमवावा लागतो, मात्र गतवर्षीपासून तालुका पोलीस ठाण्यातील चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे या ठिकाणी बुडून मरण पावण्याच्या घटनेला आळा बसण्यास मदत झाली आहे. दर शनिवार आणि रविवारी गाढेश्वर धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस कर्मचारी, तसेच पोलीस अधिकारी नेमण्यात आले आहेत. पर्यटक आपल्या कुटुंबासह या परिसरात येत असतात, मात्र मद्याच्या नशेत पावसाचा आनंद घेत काही जण खोल पाण्यात जातात.   प्रवाहाचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने धरणात उतरण्यास प्रवेशबंदी केली आहे.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply