मुरुड : प्रतिनिधी
येथील संजीवनी आरोग्य सेंटरला समाजसेवक डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी सुमारे आठ लाख रुपये किमतीची डायलिसीस मशीन भेट दिली. त्यामुळे संस्थेकडे आता चार डायलिसीस मशीन झाल्या असून, त्यांच्याद्वारे मुरूडसह श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यांतील रूग्णांवर उपचार करणे शक्य होईल, असे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी केले.
डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी संस्थेला दिलेल्या नूतन डायलिसीस मशिनच्या शुभारंभ जावेद घरटकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी सुर्वे बोलत होते. डॉ. घरटकर यांनी संस्थेला अॅब्युलन्स, दोन डायलिसीस मशिन्स देऊन दातृत्वाचा एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे, असे सांगून सुर्वे त्यांचे आभार मानले. अॅब्युलन्स कमिटीचे चेअरमन राशिद फहीम व मंगेश दांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
डायलिसीस सेंटरचे विभाग प्रमुख डॉ. मकबुल कोकाटे, डॉ. बिरवाडकर, अतिक खतीब, मंगेश दांडेकर, नितीन अंबुर्ले, जहूर कादिरी, मोअज्जम हुर्जुक, आदेश दांडेकर, शकील कडू, शशिकांत भगत, किर्ती शहा, तंत्रज्ञ मंगेश, प्रकाश मसाल आदी या वेळी उपस्थित होते.