Breaking News

विदेशी मद्यासह महिलेला अटक; पनवेल रेल्वेस्थानकात कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी

कोरोना निर्बंधांच्या काळात गोव्याहून विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणार्‍या महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या क्राईम ब्रांचने पनवेल स्थानकात रविवारी (दि. 18) पहाटे पकडले. या महिलेकडून 40 हजारांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून, तिला राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले. 01134 मंगळुरू एक्स्प्रेस रविवारी पहाटे 3.20 वाजता पनवेल स्टेशनवर आली असता, ड्युटीवर असलेले हवालदार बाळासाहेब चौगुले, शिपाई किशोर चौधरी, अक्षय सोये व त्रिशुला साल्वे यांना शेवटच्या जनरल कोचमधून एक महिला सॅक व एक ट्रॉली बॅग घेऊन उतरताना दिसली. तिची हालचाल संशयास्पद वाटल्याने शिपाई त्रिशुला साल्वे यांनी चौकशी केली असता, तिने समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे तिला क्राइम ब्रांचच्या कार्यालयात आणण्यात आले. या ठिकाणी महिलेची सखोल चौकशी केल्यावर तिने आपले नाव उज्जवला राम मगरूमखाने (रा. मोठा खांदा, पनवेल) असे सांगितले, तसेच आपल्याजवळ गोवा येथून आणलेले विदेशी मद्य असल्याची कबुली दिली. तिच्याकडे 91 लिटर विदेशी मद्य सापडले. त्याची किंमत 40 हजार 50 रुपये आहे. या महिलेविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 65(ए) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी तिला  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती रेल्वे क्राईम ब्रांचचे निरीक्षक अमित राघव यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply