Breaking News

धीर सोडू नका

एक वर्षाच्या कोरोनाविरोधी लढाईचा अनुभव आणि या घातक विषाणूला नेस्तनाबूत करणार्‍या प्रतिबंधक लसी यांच्या जोरावर ही दुसरी लाट आपल्याला नक्कीच परतवून लावता येईल. त्यासाठी दोन पथ्ये मात्र आवर्जून पाळावी लागतील. कोरोनासारख्या घातक विषाणूशी मुकाबला एकजुटीनेच करता येईल हे प्रथमत: लक्षात घ्यायला हवे. राजकारणाच्या नावाखाली एकमेकांची उणीदुणी काढण्याची ही वेळ नव्हे. दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. राजकारण्यांनी जसे संयमाचे पथ्य पाळायला हवे, तसे सामान्य नागरिकांनीही पाळायला हवे.

काळ तर मोठा कठीण आला आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी अनेक साथीचे रोग पसरत असत आणि त्यात हजारो जनसामान्यांचा बळी जात असे. गेल्या शतकाच्या सुरुवातीला प्लेगच्या साथीने हिंदुस्तानात अक्षरश: विध्वंस केला. लाखो लोक त्यात बळी पडले. अनेक घरेदारे उजाड झाली. देवी, मलेरिया, कॉलरा अशा साथीच्या रोगांमध्ये माणसे दगावणे ही त्या काळात सामान्य बाब मानली जायची. तेव्हा ब्रिटिशांचा अंमल होता. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासारखे नेते पारतंत्र्याचे साखळदंड तोडण्यासाठी ईर्ष्येने लढा देत होते, परंतु तो सारा संघर्षाचा काळ पाहिलेली पिढी आता बव्हंशी इतिहासजमा झाली आहे. त्यानंतर मृत्यूचे असे भयाकारी थैमान आपल्या आधुनिक पिढीला पहावे लागत आहे. किंबहुना, आपण सारेच या मृत्यूचक्रामध्ये भरडून निघत आहोत ही दाहक वस्तुस्थिती आहे. गेल्या वर्षी याच सुमारास कोरोनारूपी विषारी सर्पाने आपला फणा काढला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावधपणाने तातडीने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला, त्यामुळे कोरोनाची पहिली लाट आपण तुलनेने चांगल्याप्रकारे परतवू शकलो. पंतप्रधान मोदी यांनी अचानक लॉकडाऊन केल्यामुळे सारा देश तब्बल दोन महिने ठप्प झाला होता. स्थलांतरित मजुरांचे तांडे चालत आपल्या शेकडो मैलांवरील गावांकडे निघाले होते. साराच व्यापार उदीम थांबल्यामुळे अर्थचक्र स्तब्ध झाले होते, परंतु पंतप्रधानांनी हे अर्थचक्रदेखील धडाक्याने पुन्हा सुरू केले. गेल्या वर्षी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधानांवर विरोधकांनी प्रचंड आगपाखड केली होती. सारा देश बंद पाडण्याचे पंतप्रधानांचे पाऊल कसे चुकीचे आहे हेच विरोधीपक्षांचे नेते ओरडून ओरडून सांगत होते, परंतु त्यासुमारास लॉकडाऊनला पर्यायच नव्हता हे कालांतराने सार्‍यांच्या लक्षात आले. कारण त्या वेळेस कोरोना विषाणूशी लढण्याची कुठलीच तयारी आपल्या देशात नव्हती. साधे पीपीई किट सुद्धा पुरेसे उपलब्ध नव्हते. हा विषाणू किती घातक आहे, त्यावर कुठली औषधे चालू शकतात, याची कल्पना कुणाला नव्हती. एकंदरीत सगळाच अंध:कार होता, परंतु आता तसे नाही. मुख्य म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशातच तयार होऊ लागली आहे. कोरोनाशी मुकाबला करणारी औषधे आणि उपचार पद्धती यांची माहिती भारतीय डॉक्टरांना मिळाली आहे. तेव्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना आपण या शस्त्रसामग्रीनिशी नक्कीच करू शकू. असे असताना सध्या सर्वत्र उडालेल्या हाहाकाराची छायाचित्रे किंवा व्हिडिओफिती, कोरोना बळींच्या नातलगांचा आकांत असल्या गोष्टींचा सततचा मारा टीव्ही आणि समाजमाध्यमांवरून सुरू आहे. त्यामुळे जे सामुहिक नैराश्य पसरेल ते कोरोनाच्या महासंकटापेक्षाही घातक असेल. तेव्हा शक्यतो धीर न सोडता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या संकटाला तोंड देऊया.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply