पेण : प्रतिनिधी
विविध विकास योजना राबवून समाजातील वंचित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या लोकसभा प्रवासातून ग्रामस्थ संवाद साधून त्या त्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्नप्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24)पेण येथे केले. भाजपच्या रायगड लोकसभा प्रवास योजनेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी पेण शहरातील संत रोहिदास नगर आणि तालुक्यातील वाशी विभाग ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार विनय नातू, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, वैकुंठ पाटील, राजेश मपारा, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी, माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू, माजी नगरसेवक अनिरुद्ध पाटील, शहनाज मुजावर, पूजा पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रल्हादसिंह पटेल यांनी सांगितले की, केंद्र सरकार विविध विकास योजनांसाठी राज्य सरकारकडे निधी उपलब्ध करून देत असते, त्याचा पुरेपूर उपयोग, विनियोग व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक लोकप्रतिनिधींना जनतेच्या भेटी घेऊन व संवाद साधू समस्यांचे निराकरण कशाप्रकारे करता येईल, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. त्याच उद्देशाने मी येथे आलो आहे. रत्नागिरी, रायगडसारख्या छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला येण्याचे भाग्य मला लाभले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. पंतप्रधान मोदी यांनी देशाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. पंतप्रधान आवास योज़न, ग्रामसडक योजना, अटल पेन्शन योजना, ग्रामीण रस्ते, हर घर नल, जल जीवन मिशन, उज्ज्वला योजना, स्वछ भारत अभियान यासारख्या अनेक लोकहिताच्या योजना आणल्या असून यातून सामान्य नागरिकाला दिलासा देण्याचे काम होत आहे. कोरोना काळात दुसर्या देशांना औषधे पाठविण्याचे काम भारताने केले आहे, यातूनच आपला देश प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. सामान्य माणसाला लक्ष ठेऊन केंद्र सरकार काम करीत असून त्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आज आपल्या केंद्रीयमंत्र्यांनी येथे भेट दिली. यातून विकासकामे मार्गी लागतील. पेण खारेपाटला दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न सतावत असून, तो प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून 38 कोटींचा निधी आणण्याचे काम आपण केले आहे. यापुढेही विकासकामे होतच राहतील, त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले. केंद्रीयमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते या वेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.