नवी मुंबईत मृत्यूदर रोखण्याचे आव्हान; एप्रिलमध्ये बाधित रुग्ण वाढले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
संपूण जगाला कोरोना संकटाने ग्रासले आहे. भारतात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येऊन थडकली. एप्रिल महिन्यात ही लाट सर्वांत जास्त आक्रमक झाल्याचे सर्वच ठिकाणी बघावयास मिळाले. नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात एप्रिल महिन्यात बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. रुग्णवाढ होत असली तरी बरे होणार्यांची संख्याही वाढली, परंतु त्याचबरोबरीने मृत्यूही वाढले आणि हे मृत्यू रोखणे आता आव्हानात्मक झाले आहे.
एप्रिल महिना नवी मुंबईकरांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरला आहे. एक महिन्यात तब्बल 26,930 रुग्ण वाढले असून 194 जणांचा मृत्यू झाला आहे. एक लाख रुग्णसंख्येच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे. रुग्णवाढीपेक्षा मृत्यूचा वाढणारा आकडा चिंताजनक असून मृत्युदर रोखणे हेच आरोग्य यंत्रणेसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे.
नवी मुंबईमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून या संकटाशी यंत्रणा लढा देत आहे. मार्च ते सप्टेंबर दरम्यान रुग्णसंख्या झपाट्याने वाढत राहिली. जुलैमध्ये सर्वाधिक 14,967 रुग्ण वाढले व 207 जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही 10 हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले. पहिल्या लाटेमध्येही शहरात बेडची कमतरता निर्माण झाली होती.
महानगरपालिकेने वाशीमध्ये 1200 बेडचे रुग्णालय सुरू केले. खासगी रुग्णालयांची मदत घेतली. बेडची संख्या वाढविली. ब्रेक द चेन अभियानही प्रभावीपणे राबविल्यामुळे ऑक्टोबरपासून पहिली लाट ओसरण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर ते फेब्रुवारी 2021 पर्यंत पाच महिने सातत्याने रुग्णसंख्या कमी होत होती. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता निर्माण झाली.
नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत मृत्युदर नियंत्रणात होता. पाच महिने सरासरी शंभरपेक्षा कमी मृत्यू होत होते. एप्रिलमध्ये मृत्युदरानेही उसळी घेतली व एका महिन्यात 194 जणांचा मृत्यू झाला. पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा रुग्ण वाढतील याचा अंदाज आरोग्य विभागास आला नाही. पहिल्या लाटेचा अनुभव असतानाही व्हेंटिलेटर्स व आयसीयू बेड वाढविण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे दुसरी लाट धोकादायक ठरली. आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. रण एप्रिलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर मनपाने पुन्हा गाफील राहू नये. आरोग्य विभागातील उणिवा भरून काढाव्या. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची क्षमता वाढवून ऐरोली व नेरूळ रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
सुविधांअभावी कोरोनाबाधितांचा मृत्यू
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ही कोरोनाचे विविध स्ट्रेन घेऊन आलेली आहे. त्यामुळे या विषाणूची लक्षणे वेगळी असून संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन वेळोवळी होत आहे. प्रत्येक कोविड रुग्णालयात बेड, आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेरची कमतरता भासत आहे. परिणामी अनेकवेळा आयसीयू सुविधा व ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू होत आहे. त्यामुळे हे मृत्यूदर रोखण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे.