Breaking News

पाच गुंठ्यांत भेंडीचे भरघोस उत्पादन

उद्धरच्या शेतकर्‍याची किमया

पाली ः प्रतिनिधी

कोरोनाचे भयावह संकट आणि त्यायोगे वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्यमशील तरुणांनी आपली पावले कृषी क्षेत्राकडे वळवली आहेत. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील तरुण प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर याने सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवघ्या पाच गुंठ्यांतून तो भेंडीचे बंपर उत्पादन मिळवत आहे.

सध्या दिवसाला 30 किलो भेंडी निघत आहे. तरुणाईसाठी तुषारने आपल्या कृतीतून स्वयंरोजगाराचा पर्याय समोर ठेवला आहे. केळकर याने आपल्या शेतातील साधारण पाच गुंठे जमिनीची मशागत केली. जमीन नांगरून बेडणी केली. मातीची भर घातली. त्यामध्ये शेणखत, अमृतपाणी, कोंबडीची विष्ठा, नत्र, पोटॅश, फॉस्फेट आदी सेंद्रिय व रासायनिक घटकांचा योग्य मेळ घातला.

त्यातही पोटॅश व फॉस्फेट अगदी कमी प्रमाणात वापरल्याचे तुषारने सांगितले. त्यातून भेंडीच्या 200 रोपांची लागवड केली. साधारण 45 दिवसांनी भेंडी येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीचे चार-पाच दिवस उत्पादन कमी मिळाले, पण मागील तीन-चार दिवसांपासून रोज किमान  25 ते 30 किलो भेंडी मिळत आहे. ही भेंडी भाजीवाल्यांना 25 ते 30 रुपये किलो होलसेल दराने विकली जाते. तसेच तुषार व त्याची पत्नी शेजारील गावांमध्ये जाऊन भेंडीची किरकोळ विक्रीदेखील करतात.

शेतीत नवनवीन प्रयोग करणे, चांगली मशागत, योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. स्थानिक शेतकर्‍यांनीदेखील अशा प्रकारे शेती केल्यास भरघोस उत्पादनाबरोबरच चांगले उत्पन्नदेखील मिळेल.

-तुषार केळकर, तरुण प्रयोगशील शेतकरी

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply