Breaking News

नवी मुंबईत अग्निकल्लोळ

तुर्भेतील कलर कंपनीचे आगीत नुकसान

नवी मुंबई : प्रतिनिधी

तुर्भे एमआयडीसीतील  रंगाच्या कंपनीला भीषण आग  लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. वेळीच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आग विझवण्यासाठी तिन्ही प्रशासनाच्या अग्निशमन जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यास यश मिळवले.

या आगीमुळे आजूबाजूच्या तीन कंपन्यांनादेखील आगीची झळ बसली, मात्र सुदैवाने अग्निशमन दलाच्या प्रयत्नांते वेळीच आग विझविण्यात आली. या आगीत कंपनी जळून खाक झाली असून एकाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून त्याबाबत अद्याप दुजोरा मिळाला नाही.

तुर्भे एमआयडीसीमधील प्लॉट डी 315 बालाजी कलर कंपनीला रविवारी (दि. 2) सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान  आग लागली. बालाजी कंपनीत आग लागल्यानंतर इतर तिन्ही कंपन्यांमध्ये आग  पसरली. दूरपर्यंत आगीमुळे धुराचे लोट दिसून येत होते . ठाणे बेलापूर मार्गावर तर अनेकांनी आपल्या वाहन ब्रेक लावून आगीचा तांडव नृत्य आपल्या मोबाइलच्या कॅमेर्‍यात कैद करून ठेवला. आगीचे लोळ व धूर पावणे, खैरणे आदीपर्यंत नजरेस पडत होते.

घटनेची  माहिती मिळताच घटनास्थळावर एमआयडीसी, मनपा व सिडको अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या त्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यामध्ये एमआयडीसी फायरच्या चार पाण्याच्या गाड्या तर महापालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचून आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होते, अवघ्या तीन तासांनी आग विझविण्यात यश मिळाले. कंपनीला आग कशामुळे लागली हे मात्र, अद्याप कळू शकले नाही. रंगाची कंपनी असल्याने त्याठिकाणी विविध रसायन व ज्वलनशील पदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणात वाढली.

लॉकडाऊन लागू असल्यामुळे कंपनीत कामगारांची संख्या सुद्धा कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. आग वाढत राहिल्याने अग्निशमन दलापुढे आग आटोक्यात आणणे  आव्हानच झाले होते, पण अथक प्रयत्न करत तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले. या आगीत बालाजी कंपनी जळून खाक झाली, तर इतर तीन कंपन्यांचे जास्त नुकसान झाले नसून या आगीत एक मृतदेह आढळला आहे. अद्याप त्याबाबत योग्य माहिती मिळावी नसल्याचे पावणे एमआयडीसी अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

बालाजी कंपनीच्या आजूबाजूला हनुमान नगर व आंबेडकर नगर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी आगीचे उसळणारे डोम व धुराचे लोळ पाहून घरातील गॅस सिलेंडर काढून नागरी वस्ती बाहेर नेऊन ठेवले. अनेकांनी आपल्या मुलांना घेऊन थेट घराबाहेर पळ काढून सुरक्षित स्थळी जाऊन बसले. आगीचे लोळ दिसताच दोन्ही झोपडपट्टीतील रहिवाशीयांनी हातातील कामे तशीच सोडुन भीतीने घराबाहेर पळ काढला, तर तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आव्हानदेखील करण्यात आले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply