श्रीवर्धन : प्रतिनिधी
देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली श्रीवर्धन तालुक्यात महिन्यातून तीन ते चार वेळा संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. संध्याकाळी सात वाजता वीजपुरवठा सुरू होईल असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रात्री आठ ते नऊ वाजता वीजपुरवठा सुरळीत होत असल्याने महावितरणकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप वीजग्राहकांकडून करण्यात येत आहे. महावितरणकडून पूर्वी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी तीन ते चार महिन्यातून एक दिवस वीजपुरवठा खंडित केला जात असे किंवा कांदळगाव वीज केंद्रतील जनरेटरमधील इंधन बदलण्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जात असे. मात्र पावसाळ्यानंतर आजपर्यंत महिन्यातून तीन ते चार वेळा दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. संध्याकाळी सात वाजता वीजपुरवठा सुरू होईल असे महावितरणकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र वीजपुरवठा सुरळीत होण्यास आठ ते नऊ वाजतात. अशाप्रकारे दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करणे म्हणजेच अघोषित भारनियमन सुरू असल्याचे वीज ग्राहकांचे म्हणणे आहे. देखभाल व दुरुस्तीच्या कामाव्यतिरिक्त महावितरणकडून एरवीही अनेकवेळा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. श्रीवर्धन तालुका पर्यटकांच्या पसंतीचे एक नंबरचे ठिकाण आहे. या तालुक्यात नेहमीच पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतु वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या ठिकाणी आलेले पर्यटक नाराज होतात. हॉटेल, रिसॉर्ट मालकांना जनरेटरचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आता लवकरच उन्हाळा सुरू होत आहे, तसेच सुट्ट्या लागल्यानंतर पर्यटक मोठ्या प्रमाणावर श्रीवर्धन तालुक्यात येणार आहेत. त्या काळात महावितरणने वारंवार वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी तालुक्यांतील वीजग्राहक व नागरिकांकडून केली जात आहे.